पानसरे हत्याप्रकरणात सनातनला गोवण्याचा कट - सनातनचा दावा
By Admin | Updated: September 18, 2015 16:21 IST2015-09-18T16:03:58+5:302015-09-18T16:21:58+5:30
पानसरे हत्याप्रकरणात अटक झालेला सनातन संस्थेचा कार्यकर्ता समीर गायकवाड हा निर्दोष असून याप्रकरणात सनातला गोवण्यात आले आहे असा आरोप सनातन संस्थेने केला आहे.

पानसरे हत्याप्रकरणात सनातनला गोवण्याचा कट - सनातनचा दावा
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - पानसरे हत्याप्रकरणात अटक झालेला सनातन संस्थेचा कार्यकर्ता समीर गायकवाड हा निर्दोष असून सनातन संस्थेला बदनाम करण्याचा हा कट आहे अशी टीका सनातन संस्थेने केली आहे. आम्ही समीरच्या पाठिशी असून तपास यंत्रणा दबावाला बळी पडत आहे असा आरोपही सनातन संस्थेने केला आहे.
कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी समीर गायकवाड या सनातन संस्थेच्या पूर्ण वेळ कार्यकर्त्याला पोलिसांनी अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सनातन संस्थेच्या पदाधिका-यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत समीर गायकवाडला पाठिंबा दिला. दाभोलकर व पानसरेंच्या हत्याप्रकरणात न्यायालयात याचिका दाखल करुन तपास यंत्रणांवर दबाव टाकला गेला.तपास यंत्रणा या पुरोगाम्यांच्या हातचं बाहुलं आहे अशी टीका सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केली. पोलिसांवर हात उचलणा-या रझा अॅकेडमीवर बंदी घातली जात नाही, त्यावेळी जितेंद्र आव्हाड, शाम मानव, दाभोलकर कुटुंबीय कुठे होते असा सवालही वर्तक यांनी उपस्थित केला. सनातन संस्थेवर बंदी टाकण्याचे प्रयत्न होतात, पण आम्ही देशाभिमानासाठी काम करतोय आणि हे पुरोगाम्यांना बघवत नाही असेही वर्तक यांनी म्हटले आहे. दाभोलकर प्रकरणात मनीष नागोरी व विकास खंडेलवाल यांना अटक झाली पण त्यांचं पुढे काय झालं याकडेही वर्तक यांनी लक्ष वेधले.