पाळणा हलला, पण कोणाच्या घरात? विधानसभा निवडणूक निकालांवरून उद्धव ठाकरेंचा भाजपाला चिमटा
By Admin | Updated: May 21, 2016 08:09 IST2016-05-21T08:03:41+5:302016-05-21T08:09:27+5:30
शतप्रतिशत भाजप ही भाजपची खरी रणनीती पाच राज्यांतील निकालांमध्ये अजिबात यशस्वी झालेली नाही, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

पाळणा हलला, पण कोणाच्या घरात? विधानसभा निवडणूक निकालांवरून उद्धव ठाकरेंचा भाजपाला चिमटा
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - आसाममधील दणदणीत यश आणि केरळ, तामिळनाडू,पश्चिम बंगाल आणि पाँडिचेरी या राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या चांगल्या निकालामुळे भारतीय जनता पक्षाच्या गोटात सध्या आनंदाचे वातावरण असतानाच भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने मात्र हा निकाल म्हणजे भाजपाचे 'निर्भेळ' यश नसल्याचे म्हटले आहे. 'भाजपा प्रादेशिक पक्षाचा पराभव करू शकला नाही' अशी टीका कालच्या अग्रलेखात केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजही अग्रलेखातून या विजयाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ' एक आसामात शतप्रतिशत (आसाम गणपरिषदेच्या सहकार्याने) सोडले तर उरलेल्या चार राज्यांत भाजप एक प्रतिशतही नाही.तरीही विजयाने भाजपात नवा उत्साह संचारला असेल तर चांगलेच आहे. प्रतीक्षेनंतर घरात पाळणा हलला की असे व्हायचेच! मात्र चार पाळणे दुसर्यांच्या घरातही हलले आहेत' असे सांगत उद्धव यांनी भाजपाला चिमटे काढले आहेत.
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल म्हणजे महाराष्ट्रातील गजानन पाटलांप्रमाणे गंमतच आहे. या गमतीचा आनंद ज्यांना घ्यायचा आहे त्यांच्या आनंदात आम्हीसुद्धा सहभागी आहोत. आसामात भाजपने सत्ता-मुसंडी मारली आहे. १५ वर्षांपासून काँग्रेसच्या ताब्यात असलेला आसामचा गड भाजपने जिंकला आहे व त्याचे कौतुक आम्हाला आहे. आसामातील काँग्रेसची सत्ता लोकांनी उलथवून टाकली याचा संपूर्ण देशाला आनंदच आहे; पण त्यामुळे भाजपची विकासाची, विचारधारेची मतदारांनी दखल घेतली आहे, देशाच्या सर्व भागांत भाजपची लोकप्रियता उत्तरोत्तर वाढते आहे, असे जे म्हटले गेले ते कितपत खरे आहे? असा प्रश्न उद्धव यांनी विचारला आहे. तसेच दिल्ली पोटनिवडणुकीच्या निकालाचा दाखला देतानाच भाजपाने देशाच्या राजधानीतच ७-८ जागा गमावल्या असून काँग्रेसने तेथे चार जागांवर विजय मिळवल्याने 'काँग्रसमुक्त भारताचे अभियान' अद्याप यशस्वी न झाल्याची आठवणही उद्धव यांनी करून दिली आहे.
तसेच केरळ, तामीळनाडू, प. बंगालमधील काँग्रेस-मुक्तीचे श्रेय भाजप नेतृत्वाने ओरबाडणे योग्य नाही. माझे ते माझे व तुझे तेदेखील आमच्या पिताश्रींचे ही भूमिका फार काळ चालत नाही, अशी टीकाही उद्धव यांनी केली आहे.
उद्धव यांनी काय म्हटले आहे सामनाच्या अग्रलेखात ?
- 'शतप्रतिशत भाजप' हीच भाजपची खरी रणनीती आहे. पाच राज्यांतील निकालांनी ही रणनीती अजिबात यशस्वी झालेली नाही. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल म्हणजे महाराष्ट्रातील गजानन पाटलांप्रमाणे गंमतच आहे. या गमतीचा आनंद ज्यांना घ्यायचा आहे त्यांच्या आनंदात आम्हीसुद्धा सहभागी आहोत, कारण या राज्यांत काँग्रेसला धक्काच बसला नाही तर काँग्रेस पूर्णपणे कोलमडून पडली आहे; पण काँग्रेसचा इतिहास असे सांगतो की, काँग्रेस कोलमडून पडली तरी तिचा अंत होत नाही व देशात कुठे ना कुठे तरी तिचे शेपूट तरी वळवळत असते आणि शेपटाचे फटकारे बसत असतात हे लक्षात घेतले पाहिजे.
- आसामात भाजपने सत्ता-मुसंडी मारली आहे. १५ वर्षांपासून काँग्रेसच्या ताब्यात असलेला आसामचा गड भाजपने जिंकला आहे व त्याचे कौतुक आम्हाला आहे. देशाच्या राजकारणात आसामला कश्मीरसारखेच महत्त्व आहे ते अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने. त्यामुळे आसामातील काँग्रेसची सत्ता लोकांनी उलथवून टाकली याचा संपूर्ण देशाला आनंदच आहे; पण त्यामुळे भाजपची विकासाची, विचारधारेची मतदारांनी दखल घेतली आहे, देशाच्या सर्व भागांत भाजपची लोकप्रियता उत्तरोत्तर वाढते आहे, असे जे म्हटले गेले ते कितपत खरे आहे? दिल्ली महानगरपालिकेच्या १२ पोटनिवडणुकीमध्ये मरून पडलेल्या काँग्रेसने चार जागांवर विजय मिळवला. ‘आप’ने चारेक जागा जिंकल्या. म्हणजे प्रत्यक्ष दिल्लीत काँग्रेस-मुक्तीचे अभियान यशस्वी झालेले नाही. तामीळनाडूत भाजपला यावेळीही खाते उघडता आले नाही. मग तामीळनाडूच्या जनतेने भाजप-मुक्तीचे अभियान राबवले असे म्हणता येणार नाही.
- केरळात प्रचंड ताकद लावूनही भाजपास एकच जागा जिंकता आली, पण त्याच केरळात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दोन उमेदवार भरभक्कम मतांनी निवडून आणले आहेत. म्हणजे केरळात विजयाचे ढोल वाजवायला हवेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने. बंगालमध्ये ममता बॅनर्जी व तामीळनाडूत जयललितांच्या पराभवासाठी भाजपने कोणतीही कसर सोडली नव्हती. तरीही या दोघी महिला मोठा संघर्ष करून निवडून आल्या. प. बंगालमध्ये ममता यांची कोंडी करण्याची व त्यांना बदनाम करण्याची एकही संधी भाजप नेतृत्वाने गमावली नाही. तरीही ममता बॅनर्जी यांना जनतेने डोक्यावर घेतले. यललिता व ममतांचा विजय म्हणजे मोदी सरकारच्या कामगिरीची पावती म्हणता येणार नाही. त्या दोघींचे त्यांच्या राज्यातील यश स्वतंत्र व स्वयंभू आहे.
- केरळ, तामीळनाडू, प. बंगालमधील काँग्रेस-मुक्तीचे श्रेय भाजप नेतृत्वाने ओरबाडणे योग्य नाही. माझे ते माझे व तुझे तेदेखील आमच्या पिताश्रींचे ही भूमिका फार काळ चालत नाही. मोदी सरकारच्या दोन वर्षांच्या कामगिरीला व ध्येय, धोरणांना जनतेने जोरदार समर्थन दिल्याचे मत या निकालात व्यक्त झाले असे म्हटले जात आहे, पण तेदेखील कितपत योग्य आहे? कारण तसे असते तर आसाम वगळता अन्य चार राज्यांतही जनतेने मोदी सरकारच्या कामगिरीला, ध्येय- धोरणांना उचलून धरायला हवे होते. मात्र तसे झाले नाही. मग आता ममता, जयललिता यांना प. बंगाल आणि तामीळनाडूत, केरळात डाव्या पक्षांना व पुद्दुचेरीमध्ये काँग्रेसला जे यश मिळाले ते या मंडळींनी मोदी सरकारच्या ध्येय-धोरणांचा प्रचार केला म्हणून मिळाले असे म्हणायचे काय? खरे म्हणजे या सर्व पक्षांनी त्या-त्या राज्यात स्वत:च्या ‘अजेंड्या’वर निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या. त्यांना मिळालेले घवघवीत यश हे त्यांच्या ‘अजेंड्या’ला स्थानिक जनतेने दिलेला प्रतिसाद आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
- उद्या अमेरिकेत मि. ट्रम्प किंवा सौ. क्लिंटन कोणीही जिंकले तरी ती मोदी सरकारच्या कामगिरीची पावती ठरू शकेल का? पाकिस्तानात पुन्हा नवाज शरीफ यांच्या पक्षाचा विजय झाला तरी त्यांचे श्रेय येथे घेण्याचा प्रयत्न होईल. यातील गमतीचा भाग सोडा, पण हा सगळा प्रयत्न शेवटी हास्यास्पदच ठरतो. कारण प्रत्येक राज्याची परिस्थिती वेगळी आहे. काँग्रेस-मुक्त अभियान ही घोषणा चांगली आहे, पण ‘शतप्रतिशत’ भाजप हीच भाजपची खरी रणनीती आहे. पाच राज्यांतील निकालांनी ही रणनीती अजिबात यशस्वी झालेली नाही. एक आसामात शतप्रतिशत (आसाम गणपरिषदेच्या सहकार्याने) सोडले तर उरलेल्या चार राज्यांत भाजप एक प्रतिशतही नाही याची वेदना आम्हाला बोचते आहे. तरीही विजयाने भाजपात नवा उत्साह संचारला असेल तर चांगलेच आहे. प्रतीक्षेनंतर घरात पाळणा हलला की असे व्हायचेच! पण चार पाळणे दुसर्यांच्या घरातही हलले आहेत.