पाण्यासाठी महासभेत गदारोळ
By Admin | Updated: March 10, 2015 04:12 IST2015-03-10T04:12:14+5:302015-03-10T04:12:14+5:30
पूर्व भागात भेडसावणाऱ्या पाणी समस्येच्या मुद्द्यावरून महासभा तहकूब होऊनही पाणीपुरवठ्यात कोणतीच सुधारणा न झाल्याने त्याचे पडसाद

पाण्यासाठी महासभेत गदारोळ
कल्याण : पूर्व भागात भेडसावणाऱ्या पाणी समस्येच्या मुद्द्यावरून महासभा तहकूब होऊनही पाणीपुरवठ्यात कोणतीच सुधारणा न झाल्याने त्याचे पडसाद सोमवारी केडीएमसीच्या महासभेत उमटले. सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले़ यावर पाणी जोडण्यांचे काम अंतिम टप्प्यात असून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी २३ कर्मचारी तातडीने दिले जातील, अशी ग्वाही आयुक्त मधुकर अर्दड यांनी दिली.
पूर्वेकडील नगरसेवकांनी पाणी समस्येचा विषय १८ फेब्रुवारीला महासभेत लक्षवेधीद्वारे उपस्थित केला होता. या वेळी झालेल्या गदारोळानंतर महापौर कल्याणी पाटील यांनी जोपर्यंत पाणी प्रश्न निकाली निघत नाही, तोपर्यंत महासभा होणार नाही, असा पवित्रा घेत सभा तहकूब केली होती. दरम्यान सोमवारी बोलाविलेल्या सभेत हा विषय पुन्हा उपस्थित करण्यात आला. गेल्या महासभेत दिलेल्या आदेशाला २० दिवसांचा कालावधी होऊनही पाणीपुरवठ्यात कुठलीच सुधारणा झाली नसल्याकडे नगरसेविका माधुरी काळे यांनी लक्ष वेधले.
पाणी वाढले नाही़ परंतु, जे कमी दाबाने उपलब्ध होते तेदेखील गढूळ असून पूर्वेत माणसे राहतात का जनावरे? असा सवाल माधुरी काळे यांनी केला.
पाणीप्रश्न सुटणार नाही तोपर्यंत महासभा न घेण्याच्या आदेशाचा महापौरांना विसर पडला का? अशी विचारणादेखील या वेळी करण्यात आली. यावर संबंधित सभा ही
तहकूब आहे़ नवीन सर्वसाधारण सभा घेतली जाणार नसल्याचा पवित्रा घेतल्याचे महापौर पाटील यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)