गोवंश हत्याबंदीने फरक पडणार नाही
By Admin | Updated: April 13, 2015 05:42 IST2015-04-13T05:42:46+5:302015-04-13T05:42:46+5:30
इस्लामचा खानपानाबाबत कसलाच आग्रह नसल्याने राज्यातील गोवंश हत्याबंदीचा मुसलमानांवर काडीमात्र परिणाम होणार नाही.

गोवंश हत्याबंदीने फरक पडणार नाही
मुंबई : इस्लामचा खानपानाबाबत कसलाच आग्रह नसल्याने राज्यातील गोवंश हत्याबंदीचा मुसलमानांवर काडीमात्र परिणाम होणार नाही. गोवंश हत्याबंदीला मुस्लीम समाजाशी जोडून राज्य सरकार स्वत:चा अजेंडा राबवत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानात भरविलेल्या मुस्लीम आरक्षण परिषदेत मलिक बोलत होते.
मराठा समाजाबरोबर मुस्लीम समाजाचे आरक्षण पुन्हा एकदा बहाल करण्याच्या मागणीसाठी परिषदेचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रवादीचे केंद्रीय नेते तारीख अन्वर, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खा. माजिद मेनन यांच्यासह मोठ्या प्रमाणावर मुस्लीम नेते उपस्थित होते. या वेळी बोलताना सर्वच नेत्यांनी मुस्लीम आरक्षणाची मागणी करताना राज्य सरकारवर मुस्लीमविरोधी धोरणाचा आरोप केला.
एकीकडे मुस्लिमांचे आरक्षण मागे घेतानाच राज्य सरकारने गोवंश हत्याबंदीचा निर्णय जाहीर केला. गोवंश हत्याबंदीचा निर्णय मुस्लिमांशी जोडण्याचा प्रयत्न होत आहे. इस्लाममध्ये खाण्याबाबत निर्बंध नाहीत. गोवंश हत्याबंदीचा फटका मुस्लिमांना नव्हे, तर राज्यातील हिंदू शेतकऱ्यांना बसणार आहे. येत्या १० वर्षांत या निर्णयाचे विपरीत परिणाम दिसतील, असा दावा मलिक यांनी या वेळी केला. (प्रतिनिधी)