शिक्षा सुनावणार तोच न्यायालयातून आरोपींनी काढला पळ !
By Admin | Updated: July 21, 2016 23:09 IST2016-07-21T23:09:30+5:302016-07-21T23:09:30+5:30
अकोला येथील घटना; २00७ सालच्या एका खून प्रकरणात दोन दोषींनी भर न्यायालयातून केला पोबारा.

शिक्षा सुनावणार तोच न्यायालयातून आरोपींनी काढला पळ !
अकोला : २00७ सालच्या एका खून प्रकरणात दोषी सिद्ध झाल्यानंतर न्यायाधीश शिक्षा सुनावणार तोच तीनपैकी दोन आरोपींनी येथील अतिरिक्त सत्र प्रथमश्रेणी न्यायालयातून पोबारा केल्याची खळबळजनक घटना गुरुवार, २१ जुलै रोजी घडली.
बाश्रीटाकळी तालुक्यातील सिंदखेड येथील विनोद काशिराम डोंगरे यांना आरोपींनी केलेल्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला होता. ही घटना २९ जुलै २00७ रोजी जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या डाबकी रोड भागातील प्रिया टॉवर येथे घडली होती. आर्थिक देवाणघेवाणीतून विनोद डोंगरे यांना मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी विजय पांडुरंग गावंडे रा. सिंदखेड, ता. बाश्रीटाकळी यांच्या फिर्यादीवरून जुने शहर पोलिसांनी पिंटू ऊर्फ विजय बोंडे, शेखर ओमप्रकाश शर्मा, प्रशांत सुधाकर मोरे, नीलेश विश्वंभर परनाटे, अजय नारायण देवकते, संजय नारायण देवकते, संदीप रवींद्र टेकाडे, मंगेश वामन म्हैसने, संदीप दीपक मोरे यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली व न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणाची सुनावनी अतिरिक्त सत्र प्रथमश्रेणी न्यायालयात सुरू होती. या दरम्यान सरकारी पक्षाने नऊ साक्षीदार तपासले. गुरुवार, २१ जुलै रोजी या प्रकरणाची अतिरिक्त सत्र प्रथमश्रेणी न्यायाधीश जी. आर. वाघमारे यांच्या न्यायालयात अंतिम सुनावणी झाली. या प्रकरणी पिंटू ऊर्फ विजय बोंडे, शेखर ओमप्रकाश शर्मा आणि नीलेश विश्वंभर परनाटे यांना भादंविच्या कलम ३0२, १२0 अन्वये दोषी ठरविण्यात आले. उर्वरित सहा आरोपिंविरुद्ध गुन्हा सिद्ध होऊ शकला नाही. त्यानंतर शिक्षा सुनावण्यापूर्वी आरोपींच्या वकिलांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी थोडा वेळ देण्यात आला. दरम्यान ही संधी साधून आरोपींपैकी पिंटू ऊर्फ विजय बोंडे, नीलेश विश्वंभर परनाटे या दोन आरोपींनी न्यायालयातून पोबारा केला. न्यायालयाने या आरोपींविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. डाबकी रोड पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. सरकारी पक्षातर्फे अँड.गिरीश देशपांडे यांनी काम पाहिले.
आरोपींना दोषी ठरविण्यात आल्यानंतर त्यांना अंतिम शिक्षा सुनावण्यासाठी थोडा अवधी देण्यात आला. ही संधी साधून आरोपींनी न्यायालयातून पळ काढला.
अँड. गिरीश देशपांडे,
सरकारी वकिल. अकोला.