गणेश नाईकांना न्यायालयाचा दणका
By Admin | Updated: May 10, 2017 00:07 IST2017-05-10T00:07:08+5:302017-05-10T00:07:08+5:30
सीबीडीमधील ग्लास हाऊस व एमआयडीसीतील बावखळेश्वर मंदिर परिसरातील बांधकामाविषयी माजी मंत्री गणेश नाईक यांचे भाचे

गणेश नाईकांना न्यायालयाचा दणका
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई: सीबीडीमधील ग्लास हाऊस व एमआयडीसीतील बावखळेश्वर मंदिर परिसरातील बांधकामाविषयी माजी मंत्री गणेश नाईक यांचे भाचे संतोष तांडेल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने त्यांची याचीका रद्द केली आहे. भाच्याची याचीका फेटाळल्याने नाईक यांना न्यायालयाचा मोठा दणका बसला आहे. दोन्ही ठिकाणची जमीन अनुक्रमे सिडको व एमआयडीसीच्या ताब्यात जाणार असून सिडकोच्या महत्वकांक्षी मरीना प्रकल्पाचा प्रश्नही मार्गी लागणार आहे.
सीबीडीमधील खाडीकिनारी ५६०० चौरस मीटर भूखंडावर संतोष तांडेल यांनी बांधकाम केले होते. येथील ३०० चौरस मिटर क्षेत्रफळावर ग्लास हाऊसचे बांधकाम करण्यात आले होते.
याशिवाय तांडेल यांनी एमआयडीसीतील १ लाख ४५ हजार चौरस मीटर भुखंडावर अतिक्रमण केले होते. यापैकी ५५ हजार चौरस मिटरवर नारळाची झाडे, १० हजार चौरस मिटरवर तलाव, १५ हजार चौरस मीटर भुखंडावर पक्के रस्ते, २० हजार चौरस मीटरवर पेव्हर ब्लॉक, ३०० चौरस मीटरवर कार्यालय व ४०० चौरस मीटरवर मंदिरांचे बांधकाम करण्यात आले होते. या दोन्ही ठिकाणी केलेल्या अतिक्रमणाविरोधात सामाजीक कार्यकर्ते संदीप ठाकूर यांनी २०१३ मध्ये जनहीत याचिका दाखल केली होती. न्यायालयाने दोन्ही ठिकाणची अतिक्रमण हटवून भूखंड संबंधित संस्थांनी ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते. दोन्ही बांधकामे तांडेल याच्या नावावर असली तरी त्याठिकाणी राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक व त्यांच्या कुटुंबियांचा सदैव वावर असायचा. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात तांडेल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने ग्लास हाऊसच्या जागेवर सिडकोचा मरीना प्र्रकल्प उभारण्यात व बावखळेश्वर परिसरातील बांधकाम हटविण्यास स्थगिती दिली होती.