मुंबई : येत्या १ आॅगस्टच्या नागपंचमीला महाराष्ट्रात जिवंत नाग पकडू नये, असे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी दिले़त्यामुळे यंदा हा सण नागाच्या प्रतिकृतीची पूजा करूनच साजरा करावा लागणार आहे़ वन्यजीव संरक्षण कायद्याचे उपकलम २, १६, ब अंतर्गत न्यायालयाने ही बंदी आणली आहे़ या कायद्यानुसार वन्यजीव पकडण्यास निर्बंध आहेत़ तसे केल्यास वन संरक्षक अधिकारी गुन्हेगाराविरोधात पोलिसांत गुन्हा नोंदवतो़ हा गुन्हा दखलपात्र असून यासाठी तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे़ तेव्हा नागपंचमीला नाग पकडणाऱ्याला थेट कारागृहात जावे लागेल़ न्या़ अभय ओक यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले़ विशेष म्हणजे ही बंदी लागू करताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी शासनाने घ्यावी़ तसेच नाग पकडणे कसे अयोग्य आहे याबाबत शासनाने जनजागृती करावी व याचे धोरण आखून ते तीन आठवड्यांनी न्यायालयात सादर करावे, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे़ या प्रकरणी बत्तीस शिराळे ग्रामसभा यांनी अॅड़ शेखर जगताप यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती़ या याचिकेत वन्यजीव संरक्षण कायद्याचे उपकलम २, १६, ब याला आव्हान देण्यात आले होते़ यानुसार वन्यजीव पकडण्यास निर्बंध आहेत़ मात्र उत्सवासाठी वन्यजीव पकडण्याची मुभा द्यावी़ कारण नागपंचमी उत्सव पैसे कमावण्यासाठी किंवा मनोरंजनासाठी साजरा होत नाही, असा दावा याचिकेत केला आहे. वनसंवर्धन अधिकाऱ्याने सरकारी वकील जे़एस़ देव यांच्यामार्फत याचे प्रत्युत्तर सादर केले़ नाग पकडणाऱ्यांना अटक करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ आमच्याकडे नाही़ त्यामुळे पोलिसांची मदत मिळाल्यास आम्ही गुन्हेगारांना अटक करू, असे या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले़ यावर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली व ही याचिका फेटाळून लावली़ (प्रतिनिधी)
नागपंचमीला नाग पकडण्यास कोर्टाची बंदी
By admin | Updated: July 16, 2014 03:25 IST