परदेशात देशाची नालस्ती अयोग्यच

By Admin | Updated: June 11, 2016 04:00 IST2016-06-11T04:00:15+5:302016-06-11T04:00:15+5:30

पतंप्रधान परदेश दौऱ्यावर कोणत्या पक्षाचे नव्हे, तर संपूर्ण देशाचे नेतृत्व करीत असतात; मात्र नरेंद्र मोदी यांना याचे भान राहिलेले दिसत नाही. ते जेव्हा परदेशात जातात, तेव्हा देशाची आणि काँग्रेस

The country's indignity abroad is inappropriate | परदेशात देशाची नालस्ती अयोग्यच

परदेशात देशाची नालस्ती अयोग्यच

मुंबई : पतंप्रधान परदेश दौऱ्यावर कोणत्या पक्षाचे नव्हे, तर संपूर्ण देशाचे नेतृत्व करीत असतात; मात्र नरेंद्र मोदी यांना याचे भान राहिलेले दिसत नाही. ते जेव्हा परदेशात जातात, तेव्हा देशाची आणि काँग्रेस पक्षाची निंदानालस्ती करीत असतात. हे योग्य नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी मोदींना सुनावले.
राष्ट्रवादीचा १७ वा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात झाला, त्यावेळी ते बोलत होते. ‘सोळावं वरीस धोक्याचं’ म्हणतात, पण आपल्या पक्षाचा आज १७ वा वर्धापन दिन आहे. त्यामुळे धोक्याचं सोळावं वरीस संपलेलं आहे, अशी मिश्कील सुरुवात करून पवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले, की केंद्र सरकार जाहिरातबाजी करीत सुटले आहे. पण दोन वर्षांत कृषी उत्पन्नात घट झाली, औद्योगिक उत्पादन घटले, बेरोजगारांची संख्या वाढली. सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. मराठवाडा होरपळताना, रेल्वेने पाणी नेण्याची वेळ आलेली असताना भाजपावाले त्यांचेच कौतुक करून घेत आहेत, हे योग्य नाही, असा टोला पवार यांनी लगावला.
बराक ओबामा यांची कारकीर्द संपत आली आहे. गळाभेट घेण्यापलीकडे त्यांना काही काम उरलेले नाही. मोदींनी त्यांची भेट घेऊन काय मिळविले, असा सवालही त्यांनी केला. केंद्र आणि राज्य सरकारने आकसाने आपल्या नेत्यांना तुरुंगात टाकले, असे विधान पवारांनी छगन भुजबळ यांचा नामोल्लेख टाळून केले.
कल्याण-डोंबविली पालिका निवडणुकीत उद्धव यांनी सरकारची लायकी काढली होती. त्याची आठवण करून देत उद्धव यांनी आता लायकी असणाऱ्यांसोबत राहावे, असा सल्ला त्यांनी दिला. मोदींनी परदेशात जाऊन जैतापूरसाठी करार केले. त्यामुळे आता विजेच्या बदल्यात अमेरिकी लोकांना आपल्या देशात नोकऱ्या मिळतील. त्यामुळे जैतापूरला प्रकल्प होऊ देणार नाही म्हणणारी शिवसेना आता गप्प का, असा सवाल पवार यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)

जिल्ह्यांचे वाटप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते अरुण गुजराथी यांच्याकडे अमरावती, जीवनराव गोरे यांच्याकडे लातूर, आ. जितेंद्र आव्हाड नाशिक तर शशिकांत शिंदे यांच्याकडे वर्धा जिल्ह्याच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली.

Web Title: The country's indignity abroad is inappropriate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.