महाराष्ट्रात १५ ऑक्टोबरला मतदान, १९ रोजी मतमोजणी
By Admin | Updated: September 12, 2014 17:37 IST2014-09-12T17:07:53+5:302014-09-12T17:37:03+5:30
महाराष्ट्रात १५ ऑक्टोबरला मतदान होणार असून दिवाळीपूर्वीच नवीन सरकार स्थापन होईल असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.

महाराष्ट्रात १५ ऑक्टोबरला मतदान, १९ रोजी मतमोजणी
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ - महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीचा बिगुल अखेर शुक्रवारी वाजला. महाराष्ट्रा व हरियाणात एकाच टप्यात १५ ऑक्टोबरला मतदान होणार असून १९ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त व्ही.एस.संपत यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर आजपासून आचारसंहिता लागू होत आहे.
निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि हरयाणा राज्यातील निवडणुकांची घोषणा केली. महाराष्ट्र राज्यातील विधानसभेचा कालावधी ७ नोव्हेंबरला संपत असल्याने त्याआधी नवे सरकार राज्यात स्थापन करावे लागणार आहे. महाराष्ट्रात ८.२६ कोटी मतदार असून यासाठी ९०,४०३ मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयुक्त संपथ यांनी दिली आहे. तर हरयाणामध्ये १.७ कोटी मतदार असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रात २८८ जागासाठी मतदान होणार असून यामध्ये २९ जागा या अनुसूचित जाती तर २५ मतदारसंघ अनुसूचित जमातीकरीता राखीव असल्याचे यावेळी सांगण्यात आले. महाराष्ट्र आणि हरयाणा या दोन्ही राज्याच्या निवडणुकीसाठी इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्राचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. २७ सप्टेंबर अर्ज भरण्याची शेवटची तारीख असणार असून १ ऑक्टोबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येवू शकणार आहे. या निवडणुकीत 'नोटा' अर्थात उमेदवार नाकारण्याचा अधीकार मतदारांना बजावता येणार असल्याची माहितीही निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आली आहे. दरम्यान गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बीड मतदार संघातही १५ ऑक्टोबर रोजी लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे.