थर्टीफर्स्ट पार्टीचे काउंटडाउन सुरू

By Admin | Updated: December 28, 2014 00:38 IST2014-12-28T00:38:07+5:302014-12-28T00:38:07+5:30

थर्टीफर्स्टचे काउंटडाउन सुरू झाले आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी सायबर सिटीतील हॉटेल्स, बिअर बार आणि रेस्टॉरेंट आकर्षक रोषणाईसह सज्ज झाले आहेत.

Countdown to ThirtyFirst Party | थर्टीफर्स्ट पार्टीचे काउंटडाउन सुरू

थर्टीफर्स्ट पार्टीचे काउंटडाउन सुरू

शहरातील हॉटेल्स सज्ज : ग्राहकांसाठी विविध सवलती, पोलीस यंत्रणा सतर्क
नवी मुंबई : थर्टीफर्स्टचे काउंटडाउन सुरू झाले आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी सायबर सिटीतील हॉटेल्स, बिअर बार आणि रेस्टॉरेंट आकर्षक रोषणाईसह सज्ज झाले आहेत. अधिकाधिक ग्राहकांना आपल्याकडे आकर्षीत करण्यासाठी खाद्यपदार्थ आणि मद्यांवर विविध सवलती देण्यात आल्या आहेत.
नवी मुंबईत खारघर, पनवेलसह जवळपास सहाशे बिअर बार आणि रेस्टॉरेंट आहेत. तर दहा तारांकित हॉटेल्स आहेत. यात तीन थ्री स्टर आणि दोन फाईव्ह स्टार हॉटेल्सचा समावेश आहे. या सर्व हॉटेल्स व बिअर बारमधून थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी करण्यात आली आहे. विद्युत रोषणाईने हॉटेल आणि परिसर उजाळून निघाला आहे. ख्रिसमसपासूनच हॉटेल्समध्ये विविध सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. काही तारांकित हॉटेल्समध्ये अनलिमिटेड फूड, ड्रिंक त्याचबरोबर डिजे आदी आॅफर देण्यात येत आहेत. फॅमिली व लहान मुलांसाठी विशेष पॅकेज ठेवण्यात आले असून यासाठी सोशल साईट्सच्या माध्यमातून जाहिरातील करण्यात येत आहेत.
सध्या हॉटेल इंडस्ट्रीवर मंदीचे सावट आहे. विविध प्रकारच्या टॅक्समुळे ग्राहकांनी हॉटेलिंगकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे अनेक जण हॉटेल्समध्ये जाण्यापेक्षा आपापल्या सोसायटीतच थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन करतात. असे असले तरी थर्टी फर्स्टच्या निमित्ताने शहरातील अनेक हॉटेल्स चालकांनी आपापल्या परीने ग्राहकांसाठी विविध सवलती जाहिर केल्याची माहिती एका हॉटेल चालकाने दिली.
दरम्यान कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस यंत्रणाही सतर्क झाली आहे. शहरात कुठेही अनुुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीसांनी गस्त वाढवली आहे. तसेच थर्टीफस्ट पार्टीच्या आयोजनासाठी परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले असून विनापरवाना रात्रभर चालणा-या पार्ट्यांवर कारवाई केली जाणार आहे. (प्रतिनिधी)

सोशल मीडियाचा वापर
ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी अनेक हॉटेल्स चालकांनी फेसबूक व व्हॉटसअपच्या माध्यमातून सवलतींची जाहिरातबाजी केली आहे. मनोरजंनाचे कार्यक्रम, खाद्यपदार्थ व मद्यावरील आकर्षक सूट, फॅमिली व मुलांसाठी विशेष पॅकेज आदींचे जोरदार मार्केटिंग करण्यात येत आहे.

...तर टॅक्सी सेवाही मिळणार
काही हॉटेल्स चालकांनी मद्याच्या पेगवर सवलती जाहीर केल्या आहेत. पार्टीच्या मूडमध्ये असलेल्या ग्राहकांना खाद्यपदार्थांची चवही सवलतीत चाखता येणार आहे. थर्टी फर्स्टच्या दिवशी पहाटे पाच वाजेपर्यंत मद्य विक्रीची दुकाने आणि बिअर बार सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या सोयीसाठी अनेक बार चालकांनी प्रवासी टॅक्सीची सुविधा उपलब्ध केली आहे.

थर्टीफस्टच्या पार्टीत अनेकजण मद्यधुंद होऊन अनेकजण सरत्या वर्षाला निरोप देतात अशा तळीरामांवर पोलीसांची करडी नजर राहणार असल्याचे उपआयुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले.
पार्टीतील दारुच्या वापरासाठी देखिल उत्पादन शुक्ल विभागाची परवानगी आवश्यक असल्याचेही उमाप यांनी सांगितले. परंतु मैदानात किंवा सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या पार्ट्यांना मात्र परवानगी दिली जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
अनेकजण पार्टीनंतर मद्यधुंद होऊन वाहन चालवतात. यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. अशा तळीरामांना अटकाव करण्यासाठी पोलीसांकडून ड्रंक अँड ड्राईव्हची मोहीम राबवली जाणार असल्याचे वाहतूक पोलीस उपआयुक्त अरविंद साळवे यांनी सांगितले.
शहरातील मुख्य रस्त्यांवर नाकाबंदी करून ब्रेथ अ‍ॅनेलायझर आणि स्पीड गणच्या सहाय्याने मद्यपीसह वाहनांच्या वेगावर नजर ठेवली जाणार आहे. त्याकरीता अधिकाधिक पोलीस कर्मचारी बंदोबस्तावर राहतील, असे त्यांनी सांगितले.

 

Web Title: Countdown to ThirtyFirst Party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.