चित्रकारी करू शकलो नाही
By Admin | Updated: April 30, 2016 00:47 IST2016-04-30T00:47:44+5:302016-04-30T00:47:44+5:30
चित्रकार चित्र रेखाटताना ‘सुंदरता’ दाखविण्याचा प्रयत्न करतात.

चित्रकारी करू शकलो नाही
पुणे : चित्रकार चित्र रेखाटताना ‘सुंदरता’ दाखविण्याचा प्रयत्न करतात. परंतु एक व्यंगचित्रकार लोकांना पाहिल्यावर त्यांची तोडफोड कशी करावी याचाच विचार करतो. म्हणूनच चित्रकारांसारखी रंगीबेरंगी चित्रकारी करू शकलो नसल्याची खंत ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी व्यक्त केली.
इंडिया आर्ट फिएस्टा या संस्थेतर्फे दर्पण आर्ट गॅलरीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘स्पर्श’- फिलिंग आॅफ कलर्स’ या चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
या वेळी शिवसेनेचे शहर प्रमुख विनायक निम्हण उपस्थित होते. प्रदर्शन पाहिल्यानंतर मंगेश तेंडुलकर यांनी, आमचे कालचे पुणे आज अधिक सुंदर झाले असल्याचे सांगितले. तर विनायक निम्हण यांनीही राजकीय क्षेत्रात असल्यामुळे कला जोपासता आली नसल्याची खंत व्यक्त केली. त्यावर तेंडुलकर यांनी जर राजकीय लोकांनी कला जोपासली असती तर आजचे राजकीय क्षेत्राचे स्वरूप वेगळे असते, असा टोला निम्हण यांना
लगावला.
संस्था प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळणाऱ्या मिळकतीचा काही भाग सामाजिक कार्यासाठी विनियोगात आणला जाणार आहे. दि. ३ मे पर्यंत हे प्रदर्शन सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्वांना पाहण्यासाठी खुले आहे. (प्रतिनिधी)