मुंबई : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेताच विधानसभेत मंगळवारी प्रचंंड गदारोळ झाला. उसाला मदत देता मग सोयाबीन, कापूस, धान पीक उत्पादकांनाही मदत द्या, अशी मागणी सत्ताधारी बाकावरील सदस्यांनीच केली. दोन्ही बाजूंचे सदस्य वेलमध्ये उतरले. घोषणाबाजी, गदारोळ झाला आणि अखेर अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी सभागृहाचे कामकाज रेटून नेले. यानिमित्ताने ऊसविरोधात कापूस असा संघर्ष पाहायला मिळाला.आज सभागृहात गृह विभागासह शालेय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, आदिवासी विभागांवर चर्चा होती. नागपुरात मोका लावलेले कैदी तुरुंगातून पळाले, त्या पार्श्वभूमीवर चर्चा टाळण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी कापूस शेतकऱ्यांचे नाव पुढे करीत गदारोळ घातल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला.उसाच्या प्रश्नावर गेली तीन दिवस सभागृहात चर्चा सुरू होती. त्यासाठी सकाळची वेळ राखून ठेवण्यात आली होती. सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उसाच्या प्रश्नावर सरकार गंभीर आहे. अधिवेशन संपण्याच्या आत यावर तोडगा काढू, असे उत्तर दिले. त्यामुळे चिडलेल्या राष्ट्रवादीने प्रश्नोत्तराच्या तासात हा प्रश्न उपस्थित केला. जर या प्रश्नावर निर्णय होणार नसेल तर आम्हाला सभागृह चालवण्यात रस नाही. कामकाज बंद करा, आधी हा प्रश्न निकाली काढा, अशी मागणी अजित पवार यांनी केली. त्यावरून सभागृहात गदारोळ झाला आणि नंतर तो दिवसभर सुरू राहिला.दुपारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अध्यक्षांच्या दालनात झालेल्या बैठकीतील निर्णय सभागृहात जाहीर करण्यासाठी निवेदन केले, तेव्हा काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी प्रचंड घोषणाबाजी करीत कोणाला बोलू दिले नाही. कापसाच्या प्रश्नावर आधी निर्णय घ्या, अशी ते मागणी करू लागले. त्यानंतर अध्यक्षांनी अर्थसंकल्पावरील अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा पुकारली. विखे- पाटील यांनी चर्चेला सुरुवातही केली; पण अचानक महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मागण्या मंजूर करण्याची मागणी केली. अध्यक्षांनी लगेच मागण्या मंजूर झाल्याचे घोषित करून सभागृहाची बैठक दिवसभरासाठी तहकूब करून टाकली.
ऊसविरुद्ध कापूस-सोयाबीन!
By admin | Updated: April 1, 2015 02:21 IST