एसटी मुख्यालयाच्या नुतनीकरणाचा खर्च ४८ कोटी
By Admin | Updated: June 11, 2016 04:02 IST2016-06-11T04:02:23+5:302016-06-11T04:02:23+5:30
राज्यात दुष्काळी परिस्थीती असल्याने एसटी महामंडळाला कोट्यवधींच्या नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याचे माहिती नुकतीच समोर आली

एसटी मुख्यालयाच्या नुतनीकरणाचा खर्च ४८ कोटी
मुंबई : राज्यात दुष्काळी परिस्थीती असल्याने एसटी महामंडळाला कोट्यवधींच्या नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याचे माहिती नुकतीच समोर आली होती. त्यामुळे महामंडळाने दुष्काळी परिस्थीती असल्याचे सांगत वर्धापन दिन साधेपणाने साजरा केला होता. मात्र याच परिस्थीतीचा एसटी महामंडळाला आता विसर पडला आहे. महामंडळाने आपल्या मुंबईतील मुख्यालयाच्या नुतनीकरणासाठी तब्बल ४८ कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला असून हे काम जुलैपासून सुरु केले जाणार आहे. त्यासाठी कार्यालयातील सामानाची बांधाबांध करण्यासही सुरुवात करण्यात आली आहे.
मुंबई सेंट्रल येथे एसटी महामंडळाचे मुख्यालय असून या मुख्यायलयात ४०० पेक्षा जास्त कर्मचारी आहेत. एसटीचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक यांच्या कार्यालयांबरोबरच विविध विभागांच्या महाव्यवस्थापकांचीही कार्यालये तेथे आहेत. या इमारतीचे नुतनीकरण करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. जवळपास ४८ कोटी रुपये कामासाठी खर्च केले जाणार असून संपूर्ण
इमारतीला काचा लावण्यात येणार आहेत. तर प्रत्येक विभाग कार्यालयातील फर्निचरही बदलण्यात येणार आहे. या इमारतीलाच पूर्णपणे कॉर्पोरेट लूक दिला जाईल. मुख्यायालयात असणाऱ्या अनेक कार्यालयांतील सामान आणि कर्मचारी हे दुसरीकडे स्थलांतरीत केले जाणार आहेत. मुख्यालयातील काही कर्मचाऱ्यांना तर विद्याविहार येथील एसटीच्या कार्यालयात पाठविण्याचाही निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)
>दुष्काळी भागातील जनतेसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार दिला होता. राज्यातील अनेक भागांत एसटीचे प्रवासी भारमान घटले असून जानेवारी २0१६ पासून आतापर्यंत ७0 कोटींपेक्षा जास्त नुकसान महामंडळाला सोसावे लागत आहे. महामंडळाला दुष्काळाच्या झळा बसत असतानाच आता होणाऱ्या नुतनीकरणाच्या कामावर अनेक उलटसुलट चर्चा महामंडळात आहेत.
>नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बोलाविणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
साधारण दोन ते तीन वर्षापूर्वीच एसटी मुख्यालयातील काही अधिकाऱ्यांच्या कार्यालयांतील अंतर्गत सजावटीवर लाखो रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र आता नुतनीकरण केले जाणार असल्याचे हा खर्च वायाच जाणार आहे.
यासंदर्भात एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांना विचारले असता, हे काम जरी होणार असले तरी त्यावर अजून निर्णय बाकी आहे. नुतनीकरणाचे काम हे अंतर्गत केले जाईल, अशी माहीती त्यांनी दिली.