नगरसेवक दामलेंवर दरोड्याचा गुन्हा
By Admin | Updated: June 4, 2015 04:22 IST2015-06-04T04:22:22+5:302015-06-04T04:22:22+5:30
दलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक कॅप्टन आशीष दामले यांच्याविरोधात एका आश्रम चालकास धमकावणे, दरोडा आणि दंगल माजविल्याच्या आरोपाखाली

नगरसेवक दामलेंवर दरोड्याचा गुन्हा
बदलापूर : बदलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक कॅप्टन आशीष दामले यांच्याविरोधात एका आश्रम चालकास धमकावणे, दरोडा आणि दंगल माजविल्याच्या आरोपाखाली पोलिसानी गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी रात्री ११ च्या सुमारात हा प्रकार घडला असून तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. त्यांना शोधण्यासाठी बदलापूर पोलिसांची पथके रवाना झाली असून या प्रकारानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
बदलापूर जवळील इदगावमध्ये नरेश रत्नाकर यांचा आश्रम आहे. येथे मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास २० ते २५ कार्यकर्त्यांसह घुसून दामले यांनी आश्रमावर दगडफेक करून त्यांच्या गाड्यांची तोडफोड केली. त्यानंतर, घराच्या खिडकीचे गज वाकवून ते घरात शिरले. या वेळी रत्नाकर यांच्याकडे स्वरक्षणासाठी असलेली त्यांच्याकडील बंदूक हिसकावून दामलेंनी धमकावल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे या वेळी दामले यांच्या सुरक्षेत असलेले दोन पोलीसही सोबत होते. त्यांनी एक लाख रुपये नेल्याचा आरोपही रत्नाकर यांनी केला.
धमकावणे, घराची तोडफोड करणे, बंदुकीचा धाक दाखवून लूटमार असे गुन्हे बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दामलेंविरोधात नोंदवले.
घटनेनंतर दामले यांनी लोकमतच्या प्रतिनिधीला फोन करून त्यांची बाजू मांडली. त्यांच्या मते या प्रकाराला राजकीय दबावाने वेगळे वळण देण्यात आले आहे. मी निवडणुकीत स्वत:ची संपत्ती ७० कोटींची दाखवलेली असताना लाख रुपयांसाठी दरोडा का टाकू, असे त्यांनी स्पष्ट केले. आश्रमात चुकीचे प्रकार घडत आल्याने आपण हा प्रकार पाहण्यासाठी गेलो होतो. तेथील व्यक्तीने गोळीबार केल्याने कार्यकर्त्यांनी रागाच्या भरात दगडफेक केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. घडलेल्या प्रकाराचा साक्षीदार आपला पोलीस अंगरक्षक असून पोलीस तपासात खरी बाब पुढे येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.