Coronavirus: राज्यात 5 जण निरीक्षणाखाली; 25 जणांना घरी सोडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2020 09:43 PM2020-02-07T21:43:32+5:302020-02-07T21:47:33+5:30

राज्यात चीन व कोरोनाबाधित भागातून आलेल्या व्यक्तींना भेदभावाची वागणूक देऊ नये; आरोग्यमंत्र्यांचे आवाहन

Coronavirus update 5 people under observation in maharashtra 25 people got discharged | Coronavirus: राज्यात 5 जण निरीक्षणाखाली; 25 जणांना घरी सोडलं

Coronavirus: राज्यात 5 जण निरीक्षणाखाली; 25 जणांना घरी सोडलं

Next

मुंबई: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये आज 5 जणांना रुग्णालयात निरीक्षणाखाली दाखल करण्यात आले आहे. पुणे येथे तीन जणांना तर अहमदनगर व जळगाव येथे प्रत्येकी एक जण भरती करण्यात आला आहे. आतापर्यंत राज्यामध्ये 25 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, कोरोना संबंधी सोशल मीडियावर विविध अफवा पसरवल्या जात आहे. त्यावर विश्वास ठेऊ नये, चीन व कोरोना बाधित भागातून आलेल्या व्यक्तींना भेदभावाची वागणूक देऊ नये, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केले.

कोरोना बाधित भागातून येणाऱ्या व्यक्तींना कामावर रुजू करुन घेताना त्यांच्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्र किंवा प्रयोगशाळा अहवालाची मागणी केली जाते. हे चुकीचे आहे. अशा व्यक्तींची आरोग्य विभागामार्फत 14 दिवसांपर्यंत दैनंदिन सर्वेक्षण केले जाते. या काळात कोणतीही लक्षणे आढळलेल्या व्यक्तींना तपासणीची गरज नाही. त्यांच्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्र मागू नये असे आवाहनदेखील आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.

१८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आतापर्यंत ३० जणांना भरती करण्यात आले आहे. यातील ५ प्रवासी आज भरती झाले आहेत. यातील ३ जण नायडू रुग्णालयात  तर प्रत्येकी  १ जण जिल्हा रुग्णालय अहमदनगर आणि जळगाव येथे भरती करण्यात आला आहे. आता पर्यंत २५ जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आल्याचे एन आय व्ही पुणे यांनी कळवले आहे. आज भरती झालेल्या ५ ही जणांचे नमुने आज प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असून त्यांचे अहवाल उद्यापर्यंत प्राप्त होतील. आज नायडू रुग्णालयात भरती झालेल्या ३ रुग्णांपैकी एक चिनी नागरिक आहे.

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
सोशल मीडिया वर करोना विषयी विविध अफवा पसरत आहेत, त्यावर विश्वास ठेवू नये. विशेषतः चिकन खाल्ल्याने किंवा मांसाहार केल्याने कोरोनाची बाधा होऊ शकते असे संदेश फिरताना दिसत आहेत. या प्रकारच्या संदेशामध्ये काहीही तथ्य नाही. आरोग्याच्या दृष्टीने मांसाहार करताना तो पूर्णपणे शिजलेला असावा, कच्चे किंवा अर्धवट शिजलेले मांस खाऊ नये, हे महत्वाचे आहे. सोशल मिडियावरील प्रत्येक बाबीची अधिकाधिक स्त्रोतांमार्फत खातरजमा करावी, असेही आवाहन विभागामार्फत करण्यात येत आहे.

बाधित भागातून येणा-या व्यक्तींना भेदभावाची वागणूक नको
चीन किंवा इतर करोना बाधित भागातून येणा-या व्यक्तींना कामावर रुजू करुन घेताना भेदभावाची वागणूक दिली जाते, असे लक्षात आले आहे. अनेक कंपन्यांमध्ये या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रमाणपत्राची किंवा प्रयोगशाळा अहवालाची मागणी केली जाते, हे चुकीचे आहे. बाधित भागातून येणाऱ्या व्यक्तींनी १४ दिवस घरी थांबावे आणि त्या काळात आरोग्य विभागामार्फत त्यांचे दैनंदिन सर्वेक्षण करण्यात येते. या काळात कोणतेही लक्षण न आढळलेल्या व्यक्तींना कोणत्याही तपासणीची गरज नाही. त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र अथवा प्रयोगशाळा तपासणी अहवाल मागण्याची काहीही आवश्यकता नाही.

बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण १३५ प्रवाशांपैकी ५७ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत १६ हजार ६३ प्रवासी तपासण्यात आले आहेत, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

Web Title: Coronavirus update 5 people under observation in maharashtra 25 people got discharged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.