CoronaVirus News black marketing of Remdesivir in state | CoronaVirus News: राज्यात रेमडेसिवीरचा काळाबाजार जोरात

CoronaVirus News: राज्यात रेमडेसिवीरचा काळाबाजार जोरात

परभणी/नांदेड/सोलापूर : राज्यभरात सध्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असून अनेक ठिकाणी रेमडेसिवीरचा काळाबाजार सुरू झाला आहे. रेमडेसिवीरच्या मूळ किमतीपेक्षा जादा दराने या इंजेक्शनची विक्री केली जात आहे. या प्रकरणी राज्यात ठिकठिकाणी कारवाई करण्यात आली असून परभणी, नांदेड आणि सोलापूर जिल्ह्यात गुन्हे दाखल झाले आहेत. 

परभणीत बसस्थानक परिसरातील एका औषधी दुकानात रेमडेसिवीर या इंजेक्शनची जादा दराने विक्री होत असल्याने महसूल व अन्न औषधाच्या पथकाने बुधवारी रात्री छापा टाकून कारवाई केली. या प्रकरणात नवा मोंढा पोलीस ठाण्यात औषध विक्रेत्यासह अन्य एकाविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. ४ हजार ८०० रुपये किमतीचे इंजेक्शन ६ हजार रुपयांपर्यंत विक्री केले जात असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.  नांदेडमध्येही रेमडेसिवीरचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांकडून केल्या जात होत्या. अखेर बुधवारी शहरातील शिवाजीनगर भागातील डॉक्टर लाइन परिसरात चढ्या दराने रेमडेसिवीर इंजेक्शनची विक्री करणाऱ्या चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. वीरभद्र संगप्पा स्वामी, बाबाराव दिगाकंद पडोळे, बालाजी भानुदास धोंडे आणि विश्वजीत दिगंबर कांबळे उर्फ बारडकर अशी या चौघांची नावे आहेत. त्यांच्याकडून ३६ हजार ४०० रुपये मूळ किंमत असलेली ७ रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त करण्यात आली.  

सोलापूर जिल्ह्यात स्टिंग ऑपरेशन
 सोलापूर जिल्ह्यातील बार्शीतही काही मेडिकल दुकानांतून या इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचे एका स्टिंग ऑपरेशनमधून उघडकीस आले आहे. 
शहरातील तुळशीराम रोडवरील विक्रांत शहा यांच्या रुग्णालयातील मेडिकलमधून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 
राजन ठक्कर यांनी व्हिडिओतून यासंदर्भात माहिती दिली. या प्रकारानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने या मेडिकलला भेट देऊन पुढील आदेश येईपर्यंत दुकान बंद करण्याची नोटीस दिली आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus News black marketing of Remdesivir in state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.