CoronaVirus News: चिंता वाढली! राज्यात १ लाख ४,५६८ रुग्ण; दिवसभरात ११३ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 04:42 AM2020-06-14T04:42:25+5:302020-06-14T06:42:06+5:30

मृतांमध्ये मुंबईतील ६९ आणि सोलापुरातील तब्बल १० जणांचा समावेश

CoronaVirus more than 1 lakh corona patients in state 113 deaths in a day | CoronaVirus News: चिंता वाढली! राज्यात १ लाख ४,५६८ रुग्ण; दिवसभरात ११३ मृत्यू

CoronaVirus News: चिंता वाढली! राज्यात १ लाख ४,५६८ रुग्ण; दिवसभरात ११३ मृत्यू

Next

मुंबई : राज्यात लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्य सरकारसह सर्वांचीच चिंता वाढली आहे. शनिवारीदेखील नवीन रुग्णसंख्येने तीन हजारांचा टप्पा ओलांडला. तब्बल ३,४२७ रुग्ण आढळून एकूण बाधितांची संख्या १ लाख ४ हजार ५६८ झाली आहे. दिवसभरात ११३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये मुंबईतील ६९ आणि सोलापुरातील तब्बल १० जणांचा समावेश आहे.

मुंबई, पुण्यासह राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये संसर्ग वाढत आहे. जळगाव जिल्ह्यात नवीन ७५ रुग्ण आढळल्याने एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १,६६३ झाली आहे. सोलापूरात ५१ नवे रुग्ण आढळून एकूण रुग्णसंख्या १६६३ झाली आहे. दिवसभरात मृत्यू पावलेल्या ११३ जणांमध्ये ७३ पुरुष तर ४० महिला आहेत. त्यामध्ये मुंबई ६९, कल्याण-डोंबिवली १, नवी मुंबई ८, पुणे १०, सोलापूर ८, औरंगाबाद ३, लातूर २ आणि नांदेड १, यवतमाळ १, सातारा १, पनवेल ६, ठाण्यातील ३ रुग्णांचा समावेश आहे.

दुसरीकडे १ हजार ५५० रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर आतापर्यंत एकूण ४९ हजार ३४६ जण कोविडमुक्त झाले आहेत. सध्या राज्यात ५१ हजार ३७९ सक्रिय रुग्ण असून त्यामध्ये एकट्या मुंबईत २८ हजार ७६३ रुग्ण आहेत.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६ लाख ४१ हजार ४४१ नमुन्यांपैकी १६.३ टक्के नमुने म्हणजे १,०४,५६८ नमुने पॉझिटिव्ह असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांना लागण
माजी मंत्री व खासदार भाजपचे नेते जगन्नाथ पाटील यांना कोरोनाची लागण झाली असून उपचारासाठी मुलुंड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पंचाहत्तरी ओलांडलेले पाटील हे डोंबिवली पूर्वेला राहत असून त्या परिसरात कोरोनाचे जास्त रुग्ण आढळले आहेत.

धनंजय मुंडेच्या संपर्कातील आणखी दोघांना बाधा; कुटुंबातील कुणालाही संसर्ग नाही
सामाजिक न्याय मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे कोरोनाबाधित झाल्यानंतर कुटुंबातील सर्वच सदस्यांचे अहवाल निगेटिव्ह आले; परंतु त्यांच्या संपर्कातील आणखी दोघांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले. परळीजवळील माधवबाग भागातील एक ३५ वर्षीय व्यक्ती आणि मुंबईत आणखी एकाचा त्यामध्ये समावेश आहे.

Web Title: CoronaVirus more than 1 lakh corona patients in state 113 deaths in a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.