Coronavirus : राज्यात उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत मोठी घट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2021 07:35 AM2021-02-04T07:35:44+5:302021-02-04T07:36:33+5:30

राज्यात उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. राज्यात २ फेब्रुवारी रोजी ४१ हजार ५८६ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू होते तर बुधवारी यात चार हजारांनी घट झाल्याचे दिसून आले.

Coronavirus : Large reduction in the number of patients undergoing treatment in the state | Coronavirus : राज्यात उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत मोठी घट

Coronavirus : राज्यात उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत मोठी घट

Next

मुंबई : राज्यात उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. राज्यात २ फेब्रुवारी रोजी ४१ हजार ५८६ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू होते तर बुधवारी यात चार हजारांनी घट झाल्याचे दिसून आले. राज्यात बुधवारी ३७ हजार ५१६ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात दिवसभरात ७ हजार ३० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण १९ लाख ४३ हजार ३३५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.५८ टक्के झाले आहे. राज्यात बुधवारी २ हजार ९९२ रुग्ण आणि ३० मृत्यूंची नोंद झाली आहे. 
परिणामी, राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या २० लाख ३३ हजार २६६ झाली आहे, तर मृतांचा आकडा ५१ हजार १६९ झाला आहे. दिवसभरात नोंद झालेल्या एकूण ३० मृत्यूंपैकी १८ मृत्यू हे मागील ४८ तासांतील तर ५ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ७ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक काळापूर्वीचे आहेत. 

दिवसभरात नोंद झालेल्या ३० मृत्यूंमध्ये मुंबई ७, नवी मुंबई मनपा २, नाशिक मनपा १, अहमदनगर मनपा १, पुणे ५, पुणे मनपा १, सातारा २, औरंगाबाद मनपा १, बीड १, अमरावती मनपा १, वाशिम २, नागपूर २, नागपूर मनपा २, नंदुरबार २ या रुग्णांचा समावेश आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ४७ लाख ६४ हजार ७४४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३.७७ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. 

मुंबईत २ लाख ९२ हजार २२५ रुग्ण कोरोनामुक्त
मुंबई : मुंबईत बुधवारी ३९७ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत २ लाख ९२  हजार २२५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे शहर उपनगरात बरे होण्याचा दर ९४ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५६३ दिवसांवर पोहोचला आहे. सध्या ५ हजार ६२५ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 
२७ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.१२  टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत कोरोनाच्या आतापर्यंत २८ लाख ४७ हजार ३६८ चाचण्या झाल्या आहेत. दिवसभरात ५०३ रुग्ण आणि ७ मृत्यूंची नोंद झाली आहे. शहर उपनगरात कोरोना बाधितांची एकूण संख्या ३ लाख १० हजार १३४ झाली आहे.

राज्यात साडेतीन लाखांहून  अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना लस
मुंबई : राज्यात १६ जानेवारीपासून सुरु झालेल्या कोरोना लसीकऱण प्रक्रियेत आतापर्यंत ३ लाख ५४ हजार ६३३ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे. राज्यात बुधवारी ५५५ लसीकरण सत्रात दिवसभरात ५७ हजार ७५८ चे लक्ष्य होते, त्यापैकी ३५ हजार ८८९ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली, एकूण ६२ टक्के लसीकऱण पार पडले. यात ३५ हजार ९६ आरोग्य कर्मचारी तर ७९३ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले. ३५ हजार ४८१ लाभार्थ्यांना कोविशिल्ड तर ४०८ लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीने लसीकऱण कऱण्यात आले.
राज्यात दिवसभरात अकोला आणि भंडारा जिल्ह्यांत १०० हून अधिक टक्के लसीकरण झाले, यात अकोला जिल्ह्यात ३०० लाभार्थ्यांचे लक्ष्य होते, तर ३२० लाभार्थ्यांना लस देण्यात आली. तर भंडारामध्ये १०१ टक्के लसीकरण झाले. भंडाऱ्यात ७०० चे उद्दिष्ट होते त्यात ७०४ लाभार्थ्यांनी लस घेतली. परभणी, हिंगोली, सांगली, बुलढाणा, बीड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, यवतमाळ , औऱंगाबाद आणि नांदेड या जिल्ह्यांत दिवसभरात ५० टक्क्यांपेक्षाही कमी लसीकरण करण्यात आले.

कोव्हॅक्सिनचे दिवसभरात ४०८ लाभार्थी
राज्यात अमरावती जिल्ह्यात कोव्हॅक्सिन लसीचा सर्वाधिक लाभार्थ्यांनी लाभ घेतला, या जिल्ह्यात १०० जणांचे लक्ष्य होते, त्यात ११३ जणांनी लस घेतली. तर एकूण १ हजार १०१ लाभार्थ्यांनी लस घेतली. तर पुण्यात ७६, नागपूर १२०, औरंगाबाद ५६, मुंबई ४०,
सोलापूर ३ लाभार्थ्यांनी लस घेतली. राज्यात आतापर्यंत ३ हजार ५८५ लाभार्थ्यांनी कोव्हॅक्सिन लस घेतली आहे.

Web Title: Coronavirus : Large reduction in the number of patients undergoing treatment in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.