मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून आज राज्यात आणखी २८ कोविड १९ रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या १५३ झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये सांगलीमधील बाधित रुग्णांच्या संपर्कातील १५ व्यक्तींचा, तर नागपूरमधील बाधित आलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ४ जणांचा समावेश आहे. याशिवाय प्रत्येकी २ रुग्ण मुंबई आणि ठाणे येथील असून पालघर, कोल्हापूर, गोंदिया आणि पुण्यात प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे तर १ रुग्ण गुजरात राज्यातील आहे. आज मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात एका ८५ वर्षीय डॉक्टराचा मृत्यू झाला. कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. मात्र त्यांच्या कोरोना चाचणीचे अहवाल अद्याप हाती आलेले नाहीत. त्यांचे दोन नातेवाईक नुकतेच इंग्लंडहून परतलेले आहेत. या रुग्णाला मधुमेह होता तसेच त्यांना पेसमेकरही होता.राज्यात आज एकूण २५० जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत ३४९३ जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी ३०५९ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. तर १५३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत २२ कोरोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात १६, ५१३ व्यक्ती घरगुती विलगीकरणात असून १०४५ जण संस्थात्मक क्वॉरेंटाईनमध्ये आहेत. नवीन कोरोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले आहेत.
CoornaVirus: राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १५३ वर; आज २८ रुग्णांची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 19:45 IST