Corona Virus: राज्यात आणखी सहा पॉझिटिव्ह, कोरोनाग्रस्तांची संख्या २० वर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 01:54 AM2020-03-14T01:54:40+5:302020-03-14T01:55:09+5:30

नागपुरात तीन, पुण्यात एक, अहमदनगर एक, मुंबईत एकाला लागण

Corona Virus: Six more positive in the state; 20 patients of corona virus | Corona Virus: राज्यात आणखी सहा पॉझिटिव्ह, कोरोनाग्रस्तांची संख्या २० वर

Corona Virus: राज्यात आणखी सहा पॉझिटिव्ह, कोरोनाग्रस्तांची संख्या २० वर

Next

पुणे/नागपूर : राज्यात नागपूर येथे तीन आणि पुणे, नगर आणि मुंबईत प्रत्येकी एक मिळून आणखी सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे शुक्रवारी स्पष्ट आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या २० झाली आहे.

अमेरिकेहून पुण्यात आलेला आणखी एक तरुण तर अहमदनगरमध्ये एक जण पॉझिटिव्ह असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. तसेच मुंबईत हिंदुजा हॉस्पिटलमध्येही एक जण पॉझिटिव्ह आढळला आहे. पुण्यातील रुग्णांची संख्या दहावर गेली आहे. या व्यक्तींपैकी नऊ रुग्ण परदेशामध्ये जाऊन आलेले असून, केवळ ओला टॅक्सी ड्रायव्हर हा एकमेव स्थानिक व्यक्ती आहे. दरम्यान पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागातील २१६ संशयित कोरोना रुग्णांची तपासणी करण्यात आली. दहा व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले असून, १९१ रुग्णांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सध्या १५ व्यक्ती नायडू रुग्णालयात दाखल असून, त्यांचे तपासणी अहवाल एक-दोन दिवसांत प्राप्त होतील, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.

नागपुरातील कोरोनाग्रस्त रुग्णाची पत्नी व मामेभाऊ यांच्यासह आणखी एकाला लागण झाल्याचे स्पष्ट झाले. अमेरिकेहून आलेल्या ४५ वर्षीय व्यक्तीला बुधवारी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) दाखल केले. या रुग्णाचे नमुने पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्याशी संपर्कात आलेल्या १४ संबंधितांचे नमुने तपासले. यात त्यांचे सासरे, दोन्ही मुले, तपासणी करणारे दोन्ही डॉक्टर, कर्मचारी व मित्राचे असे १२ संबंधितांच्या नमुन्यांचा अहवाल गुरुवारी रात्री उशिरा निगेटिव्ह आला. परंतु त्यांच्या ४३ वर्षीय पत्नी व ४५ वर्षीय मामेभाऊ यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. पॉझिटिव्ह आलेली महिला शिक्षिका आहे. या तिघांची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवींद्र पातुरकर यांनी सांगितले.


सोशल मीडियावरील अफवांचा, जिल्हाधिकाऱ्यांनाही मनस्ताप
नागपूर : कोरोनाबाबत सोशल मीडियावर अफवांचे पेव फुटल्याने अनेकांना याचा मनस्ताप होतोय. नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनाही याचा फटका सहन करावा लागला. एका वेबसाईटने जिल्हाधिकाºयांनाच कोरोनाची लागण झाल्याचे खोटे वृत्त प्रसारित केले. त्यानंतर त्यांना सकाळपासून नातेवाईकांसह अनेकांचे फोन येऊ लागले. अखेर दुपारी पत्रपरिषद घेऊन हे वृत्त खोटे असल्याचा खुलासा त्यांनी केला.

वार्तांकनाबाबत निर्देश
मुंबई : कोरोना विषाणूसंदर्भात वार्तांकन करताना रूग्णांची, त्यांच्या निवासस्थानाची ओळख उघड होणार नाही याची काळजी घ्यावी, असे निर्देश उपसभापती नीलम गोºहे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिले. तसेच विलगीकरण कक्ष असलेल्या रूग्णालयातून थेट प्रसारण करू नये. माध्यम प्रतिनिधींनाही संसर्गाचा धोका असल्याने सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहनही त्यांनी केले. सभागृहात औचित्याच्या मुद्दाद्वारे सदस्यांनी कोरोनाबाबत प्रश्न विचारले.

विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या हातावर सॅनिटायझर
पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या हातावर सॅनिटायझरचे दोन थेंब टाकण्यास मंदिर समितीने सुरू केली आहे. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आता सोमवारपासून बायोमॅट्रीक हजेरी बंद करण्यात येणार आहे़ माढा येथे १ एप्रिल रोजी आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा रद्द करण्यात आला आहे.

१४ ते २१ मार्च सुट्टीचे पत्र बनावट
महाराष्ट्रासह अन्य चार राज्यांमध्ये १४ ते २१ मार्च सुट्टी जाहीर करण्याबाबत केंद्र शासनाच्या पत्राचा हवाला देऊन समाजमाध्यमांत माहिती दिली जात आहे. ते पत्र बनावट असून राज्य शासनाने केंद्राकडे विचारणा केली, त्यावर अशा स्वरूपाचे पत्र काढण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले. या पत्रावर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन राज्य शासनाने केले आहे.

औरंगाबादमधील संशयिताचा अहवाल निगेटिव्ह
घाटी रुग्णालयात कोरोना संशयीत १६ वर्षाच्या मुलाचा अहवाल निगेटीव्ह आल्याने औरंगाबादकरांचा जीव भांड्यात पडला आहे. उत्तर प्रदेशातील मीरपूर येथील रहिवासी असलेला हा मुलगा भावाला भेटण्यासाठी येथे आला होता. ताप येऊन घसा बसला, तसेच दमही लागत होता त्यामुळे त्याला घाटीमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु त्याला कोरोना नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे, असे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुरेश हरबडे यांनी सांगितले.

विदेशी पर्यटकांची थर्मसस्कॅनिंग होणार
चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात येणाºया विदेशी पर्यटकांची थर्मसस्कॅनिंग करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी दिल्या आहेत.
 

Web Title: Corona Virus: Six more positive in the state; 20 patients of corona virus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.