देशानेच नव्हे, कोरोना विषाणूने घातलेले थैमान अवघ्या जगाने पाहिले. या विषाणूमुळे अवघे जग ठप्प झाले होते. हाच कोरोना विषाणू जगभरात पुन्हा एकदा डोकं वर काढू पाहत आहे. जगभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना, महाराष्ट्रातही सक्रिय रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अवघ्या एका आठवड्यात ही रुग्ण संख्या १२ वरून ५६ पर्यंत पोहोचली आहे. सध्या देशभरात एकूण २५७ कोरोना रुग्ण आढळले आहेत. सर्वाधिक रुग्ण संख्येमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर असून, ९५ रुग्णांसह केरळ आघाडीवर आहे. केरळमध्ये कोरोना विषाणूने एक बळी देखील घेतला आहे.
मुंबईतील रुग्णांची वाढ नियंत्रणात राहण्यायोग्य असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेने म्हटल्याचे, डॉ. दक्षा शाह यांनी सांगितले. केईएम रुग्णालयात एका १४ वर्षीय आणि ५४ वर्षीय रुग्णांच्या झालेल्या मृत्यूंमुळे चिंता निर्माण झाली असली तरी, त्यांचा मृत्यू हा इतर गंभीर आजारांमुळे झाला असल्याचे, बीएमसीने स्पष्ट केले. वाढत्या श्वसन समस्यांमुळे, बीएमसीने गंभीर रुग्णांसाठी आरोग्य सेवा क्षमता वाढवली असू, मुले आणि गर्भवती महिलांसाठी विशेष तरतुदींचा समावेश आहे.
आरोग्य सेवा अलर्ट मोडवर!
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या एका अहवालानुसार, भारतातील बहुतेक कोरोना प्रकरणे ही सौम्य लक्षणांची आहेत. मात्र, रुग्णांची संख्या वाढ लक्षात घेता, आरोग्य सेवा महासंचालकांनी राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद यासारख्या प्रमुख आरोग्य संस्थांच्या तज्ज्ञांसोबत एक बैठक बोलावली. जर, रुग्णांची संख्या वाढत राहिली तर, रुग्णालयांची क्षमता वाढवली जाण्याची शक्यता आहे.
रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांसाठी काय व्यवस्था आहे?अधिकाऱ्यांच्या मते, मुंबई महानगर प्रदेशातील रुग्णालयांमध्ये चांगल्या उपचार आणि मार्गदर्शन सुविधा उपलब्ध आहेत. सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये २० बेड (MICU), बालरोग आणि गर्भवती महिलांसाठी २० बेड आणि ६० सामान्य बेड आहेत. याशिवाय, कस्तुरबा रुग्णालयात २ अतिदक्षता विभाग (ICU) बेड आणि १० बेडचा वॉर्ड आहे. गरज पडल्यास, ही क्षमता त्वरित वाढवली जाईल.