Corona Caller Tune: बाप रे बाप, डोक्याला ताप! कोरोना कॉलरट्यूनमुळे दररोजचे नाहक तीन कोटी तास वाया
By देवेश फडके | Updated: January 19, 2021 11:46 IST2021-01-19T11:42:31+5:302021-01-19T11:46:45+5:30
कोरोना संकटाने देशभरात धुमाकूळ घातला असताना जनजागृतीसाठी कोरोना कॉलर ट्यून तयार करण्यात आली. मात्र, कोरोनाची ही कॉलरट्यून आता डोकेदुखी बनत चालली आहे.

Corona Caller Tune: बाप रे बाप, डोक्याला ताप! कोरोना कॉलरट्यूनमुळे दररोजचे नाहक तीन कोटी तास वाया
मुंबई : कोरोना संकटाने देशभरात धुमाकूळ घातला असताना जनजागृतीसाठी कोरोना कॉलर ट्यून तयार करण्यात आली. मात्र, कोरोनाची ही कॉलरट्यून आता डोकेदुखी बनत चालली आहे. या कोरोना कॉलरट्यूनमुळे दिवसाचे तब्बल तीन कोटी तास वाया जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कोरोना कॉलरट्यूनसंदर्भात करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणातून ही बाब समजली आहे.
कोरोना संकट अद्यापही नियंत्रणात आलेले नाही. कोरोना कालावधीत सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोनाबाबतच्या जनजागृतीसाठी गेल्या काही महिन्यांपासून ही कॉलरट्यून मोबाइलच्या सर्व नेटवर्कवर ऐकवली जात होती. हीच कॉलरट्यून तापदायक आणि त्रासदायक ठरत आहे. कारण फोन लावला की, तातडीने फोन लागणे ग्राहकाला अपेक्षित असते. परंतु, कोरोना कॉलरट्यूनमुळे ग्राहकाचा नाहक वेळ फुकट जात असल्याचे समोर आले आहे.
कोरोनाच्या या कॉलरट्यूचा कालावधी ३० सेकंदाचा आहे. भारतात प्रतिदिन सरासरी ३०० कोटी कॉल केले जातात. कोरोना कॉलरट्यूनमुळे ग्राहकांचे तब्बल ३ कोटी तास वाया जातात, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर एकूण रोजचे नुकसान १० कोटी तास होत असल्याचेही सांगितले जात आहे.
दरम्यान, करोना कॉलर ट्यून आतापर्यंत ज्येष्ठ अभिनेते बीग बी अमिताभ बच्चन यांच्या आवाजात होती. आता ती रद्द करण्यात आल्याची माहिती दिल्ली उच्च न्यायालयास देण्यात आली. एका जनहित याचिकेद्वारे याबाबत आक्षेप घेण्यात आला होता. एका संस्थेने केलेल्या सर्व्हेक्षणानुसार, ग्राहकाला नाहक ही कॉलरट्यून ऐकावी लागते आणि महत्त्वाच्या कामातही व्यत्यय येतो आणि उशीर होतो, असे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.