अस्वस्थतेमागे सहकाराचे राजकारण

By Admin | Updated: October 27, 2014 02:47 IST2014-10-27T02:47:05+5:302014-10-27T02:47:05+5:30

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर सरचिटणीस पदाचा राजीनामा देणारे मनसे नेते प्रवीण दरेकर भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

Cooperative politics behind disorder | अस्वस्थतेमागे सहकाराचे राजकारण

अस्वस्थतेमागे सहकाराचे राजकारण

मुंबई : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर सरचिटणीस पदाचा राजीनामा देणारे मनसे नेते प्रवीण दरेकर भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. दरेकर मनसेत अस्वस्थ असल्याची चर्चा असली तरी या अस्वस्थतेमागे मुंबईतील ‘सहकार’ क्षेत्रातील राजकारण कारणीभूूत असल्याची चर्चा आहे.
मनसेच्या सर्व माजी आमदारांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, प्रवीण दरेकर अशा मनसेतील दिग्गजांनाही मतदारांनी साफ नाकारले. मनसेच्या पहिल्या फळीतील नेते व मुंबै बँकेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात वावरणारे दरेकर मागाठाणे मतदारसंघात तिसऱ्या स्थानावर फेकले गेले. निकालानंतर दरेकर अस्वस्थ असून, मनसेला सोडचिठ्ठी देण्याच्या मन:स्थितीत असल्याचे बोलले जात होते. त्यातच आमदारांच्या निष्क्रियतेचा पक्षाला फटका बसल्याचा दावा बाळा नांदगावकरांनी केला. ही टीका जिव्हारी लागल्याने दरेकरांनी सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला. नांदगावकरांचा आरोप फेटाळताना आपण मतदारसंघात जनतेची कामे केल्याचा दावा दरेकरांनी केला. यासंदर्भात राज ठाकरेंची भेट घेत आपली बाजूही मांडली.
भाजपा प्रवेशाच्या चर्चेवर आपण अद्याप मनसेतच असल्याची प्रतिक्रिया दरेकर यांनी दिली आहे. मात्र ते भाजपा नेत्यांच्या संपर्कात असून, वाटाघाटी चालू आहेत. मुंबै बँक, मजूर फेडरेशनच्या माध्यमातून दरेकर सहकार क्षेत्रात कार्यरत आहेत. आमदारकीच्या काळात दरेकरांनी अन्य पक्षांतील नेत्यांशी चांगले संबंध प्रस्थापित केले होते. राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांशी असलेली त्यांची जवळीक चर्चेचा विषय ठरली होती.
गेल्या काही काळात मुंबै बँकेतील गैरव्यवहार चव्हाट्यावर आले, तर मजूर फेडरेशनबाबतही तक्रारी आहेत. सहकारातील आपले अस्तित्व राखण्यासाठीच भाजपा प्रवेशाची धडपड चालू असल्याचे बोलले जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Cooperative politics behind disorder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.