सहकारातील भ्रष्टाचार निपटून काढू
By Admin | Updated: November 4, 2014 03:21 IST2014-11-04T03:21:28+5:302014-11-04T03:21:28+5:30
सहकारी संस्थांमधील भ्रष्टाचार संपविणे सहज शक्य आहे. त्यासाठी कोणतीही मोठी शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली तर मी करणारच

सहकारातील भ्रष्टाचार निपटून काढू
विश्वास पाटील, कोल्हापूर
सहकारी संस्थांमधील भ्रष्टाचार संपविणे सहज शक्य आहे. त्यासाठी कोणतीही मोठी शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली तर मी करणारच, अशी ग्वाही सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी येथे ‘लोकमत’ला दिलेल्या खास मुलाखतीत दिली.
भाजपाचे चंद्रकांत पाटील यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यामुळे कोल्हापुरात जल्लोष आहे. मंत्रिपदाची शपथ घेऊन येथे आल्यापासून येथील संभाजीनगर परिसरातील पाटील यांच्या निवासस्थानी नेते व कार्यकर्त्यांची रीघ लागली आहे. सत्कार स्वीकारत असतानाच त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.
प्रश्न - राज्यातील सहकार चळवळ मोडीत निघाली आहे. तिला संजीवनी देण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार?
पाटील - सहकारामुळेच ग्रामीण महाराष्ट्राचा कायापालट झाला. सहकार चांगलाच आहे, परंतु त्यातील अपप्रवृत्ती व भ्रष्टाचारामुळे ही चळवळ बदनाम झाली. सहकारातील भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यास माझे प्राधान्य राहील. त्यासाठी कायद्यात बदल करावा लागेल. मागच्या सरकारने सहकार कायद्यात जे आपल्याला सोयीचे आहेत असेच काही बदल केले. जाणीवपूर्वक काही त्रुटी राहतील अशी व्यवस्था सरकारनेच केली होती. हे बदल कायद्यानेच दुरुस्त करावे लागतील.
राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर कारवाई करणार का?
- माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ५२ माजी संचालकांना गैरव्यवहारप्रकरणी नोटिसा पाठविल्या आहेत. ही कारवाई चालूच राहील. कोण माजी मंत्री व कोण मोठे नेते आहेत, याचा विचार करणार नाही.
सहकारातील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे काय?
- सहकारी संस्थांमध्ये मुख्यत्वे अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच गैरव्यवहार होत असतात. तर काही अधिकाऱ्यांनी राजकीय दबावापोटी गैरव्यवहाराकडे केलेला कानाडोळाही त्यास कारणीभूत असतो. त्यामुळे राज्य बँकेच्या संचालकांवर तरी आम्ही कारवाई करूच, तेथील अधिकारीही त्यामध्ये दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल.
सहकार खात्यात तुम्हाला कोणते बदल अपेक्षित आहेत?
- सहकार खात्यात नेमके काय बदल करायला हवेत, याचा अभ्यास आम्ही सुरू केला आहे. त्यासंबंधीचे प्रस्ताव सहकार खात्यातील चांगले अधिकारी आणि तज्ज्ञांकडून मागवले आहेत. सहकार सुधारावा अशी अपेक्षा बाळगणारे व काही चांगले सुचवू पाहणारे अनेक अभ्यासू लोकआमच्या संपर्कात आहेत. त्यांचीही मदत घेऊ.