गुंतवणुकीसाठी ब्रिटिश कंपन्यांना सहकार्य करणार - देवेंद्र फडणवीस
By Admin | Updated: April 12, 2017 02:30 IST2017-04-12T02:30:30+5:302017-04-12T02:30:30+5:30
ब्रिटनचे संरक्षणमंत्री मायकेल फालन यांनी शिष्टमंडळासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. महाराष्ट्रात संरक्षण उत्पादन

गुंतवणुकीसाठी ब्रिटिश कंपन्यांना सहकार्य करणार - देवेंद्र फडणवीस
मुंबई : ब्रिटनचे संरक्षणमंत्री मायकेल फालन यांनी शिष्टमंडळासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. महाराष्ट्रात संरक्षण उत्पादन निर्मितीसाठी पोषक वातावरण व साधनसामग्री असल्याने ब्रिटिश कंपन्यांनी येथे गुंतवणूक केल्यास, राज्य शासन त्यास मदत करेल, असे प्रतिपादन फडणवीस यांनी केले. हवाई वाहतूक व सायबर सुरक्षा क्षेत्रातही गुंतवणुकीस ब्रिटिश कंपन्या उत्सुक असल्याचे फालन यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले की, अनेक जागतिक कंपन्यांनी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राला पसंती दर्शविली आहे. राज्यात संरक्षण उत्पादनाशी संबंधित विविध कंपन्या व आस्थापना असल्यामुळे आवश्यक वातावरण आहे, तसेच राज्याने या क्षेत्राला चालना देण्यासाठी संरक्षण उत्पादननिर्मिती धोरण तयार केले आहे. राज्यात कुशल मनुष्यबळ उपलब्ध असून, माहिती तंत्रज्ञान हब आहे. सायबर सुरक्षेसाठी राज्याची स्वतंत्र यंत्रणा असून, प्रत्येक जिल्ह्यात सायबर सुरक्षा प्रयोगशाळा उभी केली आहे.
ब्रिटिश शासन व तेथील कंपन्यांकडून होणाऱ्या गुंतवणुकीच्या प्रक्रियेसाठी दोन्ही बाजूच्या लोकांची एक समिती करण्यात यावी, जेणेकरून प्रत्यक्ष गुंतवणुकीस सहाय्य होईल, असे मतही मुख्यमंत्र्यांनी मांडले.
ब्रिटिश संरक्षणमंत्री फालन यांनी राज्यात विमान वाहतूक, संरक्षण उत्पादन निर्मिती, तसेच सायबर सुरक्षा या क्षेत्रात ब्रिटिश कंपन्या गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले. संरक्षण क्षेत्रातील गुंतवणुकीस भागीदार होण्यास उत्सुक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्याद्वारे ‘मेक इन महाराष्ट्र’ या उपक्रमात सहभागी होता येईल. एरोस्पेस, संरक्षण उत्पादन निर्मिती क्षेत्रातील डिझाईन व विकास यामध्येही गुंतवणूक करण्यास ब्रिटिश कंपन्या तयार आहेत, असे ते म्हणाले.
राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक, राजशिष्टाचार विभागाचे सचिव बाजीराव जाधव, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी आदी उपस्थित होते. ब्रिटिश शिष्टमंडळात ब्रिटिश उच्चायुक्त डॉमिनिक अॅक्वॉथ, पर्मनंट सेक्रेटरी स्टिफन लव्हग्रेव्ह यांच्यासह उच्चाधिकाऱ्यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)