लॉन, मंगल कार्यालयापुढील वाहने जप्त करा!
By Admin | Updated: July 18, 2014 01:26 IST2014-07-18T01:26:22+5:302014-07-18T01:26:22+5:30
शहरातील मंगल कार्यालये व लॉन मालकांनी मंजूर नकाशाप्रमाणे पार्किंगसाठी जागा सोडलेली नाही. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. अशा लॉन व मंगल कार्यालयासमोर उभी असलेली वाहने

लॉन, मंगल कार्यालयापुढील वाहने जप्त करा!
मनपा आयुक्तांचे निर्देश : पार्किंगसाठी जागा न सोडणाऱ्या इमारतीवरही कारवाई
नागपूर : शहरातील मंगल कार्यालये व लॉन मालकांनी मंजूर नकाशाप्रमाणे पार्किंगसाठी जागा सोडलेली नाही. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. अशा लॉन व मंगल कार्यालयासमोर उभी असलेली वाहने जप्त करावी व मालकांवर कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त श्याम वर्धने यांनी आज दिले.
उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेच्या अनुषंगाने शहरात रस्त्यावर वाढत असलेल्या अतिक्रमणावर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठन करण्यात आले आहे. या समितीची सभा आज पार पडली. या बैठकीत अतिक्रमण हटविण्याकरिता झोननिहाय केलेल्या कार्यवाहीचा आढावा आयुक्तांनी घेतला.
पार्किंगसाठी परवाना देण्यात आलेल्या इमारतीमधे, जागा सोडण्यात आली की नाही, याचे सर्वेक्षण करून आढावा घेण्यास झोनच्या सहा. आयुक्तांना सांगितले. तसेच ज्या इमारतीमध्ये पार्किंगसाठी सोडलेल्या जागेवर बांधकाम करण्यात आले आहे, त्यांना नोटीस देऊन अतिरिक्त बांधकाम काढण्यात यावे, असे निर्देश दिले.
ज्या मंगल कार्यालयांनी व लॉन मालकांनी नियमानुसार पार्किंगसाठी जागा सोडली नाही, अशांचा सर्वे करून त्यांना नोटीस देऊन, त्यांच्यावरसुद्धा कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
तसेच झोन अंतर्गत गॅरेज सार्वजनिक जागेवर अनधिकृतरीत्या उभारण्यात आले असतील, त्यांना त्वरित हटवावे. गॅरेजसमोर उभ्या करण्यात आलेल्या वाहनांचा क्रमांक व गॅरेज मालकाच्या नावासहित पोलिसांच्या वाहतूक विभागाला व प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याला कळवावा. वाहतुकीला अडथळा निर्माण करणारी रस्त्यावरील अतिक्रमणे काढावी, वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी झोन अंतर्गत अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करावी, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.
या बैठकीला उपविभागीय अधिकारी राहुल रेखावार, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त भरत तागडे, अति. उपायुक्त प्रमोद भुसारी, अतिक्रमण नियंत्रण अधिकारी दिलीप जामगडे, कार्यकारी अभियंता मदन कुकरेजा, नॅशनल हायवेचे अभियंता के. एस. इखार, नासुप्र कार्यकारी अभियंता सुरेश देव, आर. डब्ल्यू. जनबंधू, व्ही. डी. कपले, प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण, अतिक्रमण अधीक्षक अरुण पिपुरडे व सर्व झोनचे सहा. आयुक्त, अभियंता व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)