संमेलन म्हणजे पवित्र गायींचा गोठा आहे का!
By Admin | Updated: December 17, 2014 02:53 IST2014-12-17T02:53:35+5:302014-12-17T02:53:35+5:30
सगळ्या क्षेत्रात राजकारणी मंडळी चालतात. मग साहित्य संमेलनातच त्यांना अस्पृश्य का मानले जाते. संमेलन म्हणजे पवित्र गायींचा गोठा आहे

संमेलन म्हणजे पवित्र गायींचा गोठा आहे का!
पुणे : सगळ्या क्षेत्रात राजकारणी मंडळी चालतात. मग साहित्य संमेलनातच त्यांना अस्पृश्य का मानले जाते. संमेलन म्हणजे पवित्र गायींचा गोठा आहे का, असा सवाल नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी उपस्थित करीत संमेलनातील राजकारण्यांच्या सहभागाबद्दल एकप्रकारे समर्थनच दर्शविले.
संमेलनामध्ये स्वागताध्यक्षापासून ते उद्घाटकापर्यंत राजकारण्यांचा सहभागाबद्दल नेहमीच टिकेची झोड उठविली जाते़ मात्र डॉ. मोरे म्हणाले, राजकीय मंडळीचा वावर हा सर्वच क्षेत्रात वाढला आहे़ तिथे राजकारणी चालतात मग साहित्य क्षेत्रातच त्यांना अस्पृश्य का समजले जाते. संमेलनात कुणी राजकीय नेता आला की त्याचे स्वागत करण्याची प्रथा आहे. मात्र ही गोष्ट व्यक्तिसापेक्ष आहे. कुणी किती झुकायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे मंगळवारी आयोजित वार्तालाप कार्यक्रमात डॉ. मोरे बोलत होते. शहराबरोबरच ग्रामीण भागातही इंग्रजी शाळांचे सध्या सर्वत्र पेव फुटले असल्याने मराठी शाळा बंद पडत आहेत़ सरकारने यावर उपाययोजना करण्याची गरज आहे, या विचारप्रवाहावरही डॉ. मोरे यांनी ताशेरे ओढले. ते म्हणाले, सरकारने काय काय करायचे? आपली काही कर्तव्ये नाहीत का? ग्रामीण भागात इंग्रजी शाळांचे पेव फुटले आहे म्हणून एवढी ओरड केली जात आहे. मग शहरी भागांचे काय? हा दुटप्पीपणा नाही का? ग्रामीण आणि शहरी असा भेदच करता कामा नये.