आरक्षण खिडकीवरील वाद, जखमीची मृत्यूशी झुंज
By Admin | Updated: August 18, 2014 09:30 IST2014-08-18T09:30:01+5:302014-08-18T09:30:20+5:30
उल्हासनगरमधील रेल्वे स्थानकातील आरक्षण खिडकीजवळील रांगेच्या वादातून आरक्षण दलालांनी दोघांवर केलेल्या धारदार शस्त्र हल्ल्यातील एक जखमी मृत्यूशी झुंज देत आहे

आरक्षण खिडकीवरील वाद, जखमीची मृत्यूशी झुंज
रेल्वे स्टेशनला विळखा : दलालांचा हल्ला
उल्हासनगर : येथील रेल्वे स्थानकातील आरक्षण खिडकीजवळील रांगेच्या वादातून आरक्षण दलालांनी दोघांवर केलेल्या धारदार शस्त्र हल्ल्यातील एक जखमी मृत्यूशी झुंज देत आहे. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ही घटना घडली होती. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
रेल्वे स्टेशनच्या नूतनीकरणाच्या वेळी पोलीस चौकी हटविल्यामुळे परिसरातील गैरकारभारात वाढ झाली आहे. १५ ऑगस्ट रोजी वीरेंद्र राठोड-२७ हा तरुण तत्काळ तिकिटासाठी सकाळी रांगेत उभा होता. रांगेच्या वादातून नेहमीच्या तिकीट दलांलानी राठोड यांना धारदार शस्त्राने भोसकले. तो सध्या मुंबईतील रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.
उल्हासनगर रेल्वे स्टेशनच्या संरक्षणासाठी फक्त २ रेल्वे पोलीस तैनात असल्याचे उघड झाले असून, आरक्षण खिडकीजवळ फक्त १ पोलीस तैनात केला जातो. स्टेशनच्या संरक्षणाची जबाबदारी एका पोलिसावर अवलंबून असल्याची माहिती रेल्वेचे अधिकारी जी.एम. कोळी यांनी दिली आहे. स्टेशन परिसरात रेल्वे पोलिसांची संख्या वाढवून गस्त घालण्याची मागणी होत आहे.
उल्हासनगर रेल्वे स्टेशनचा ताबा दलाल व झोपडपट्टी गुंडांनी घेतल्याचे चित्र असून, रेल्वे प्रशासन व पोलीस बघ्याची भूमिका घेत आहेत. स्टेशनच्या दोन्ही बाजूंना फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले असून, फेरीवाल्यांनी प्रवेशद्बार बंद केले की काय? अशी स्थिती स्टेशनची झाली आहे. स्टेशन प्रवेशद्बाराजवळ विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याची पोलीस चौकी होती. दलालांवर व गुंडांवर चौकीमुळे धाक व जरब होती. (वार्ताहर )