वादग्रस्त कार्टून - पंकजा मुंडे राजसिंहासनावर तर मुख्यमंत्री, गडकरी सशस्त्र शिपाई
By Admin | Updated: February 23, 2016 21:02 IST2016-02-23T21:02:21+5:302016-02-23T21:02:21+5:30
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपच्या महिला मंत्री पंकजा मुंडे या तिघांच्या एका एडीटेड फोटोने सध्या सोशल मिडीयावर चांगलाच धुमाकुळ घातला आहे.

वादग्रस्त कार्टून - पंकजा मुंडे राजसिंहासनावर तर मुख्यमंत्री, गडकरी सशस्त्र शिपाई
>ऑनलाइन लोकमत
जळगाव , दि. २३ - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपच्या महिला मंत्री पंकजा मुंडे या तिघांच्या एका एडीटेड फोटोने सध्या सोशल मिडीयावर चांगलाच धुमाकुळ घातला आहे. या फोटोत पंकजा मुंडे या सिंहासनावर विराजमान झाल्या आहेत. तर, पंकजाताईंच्या संरक्षणासाठी देवेंद्र फड़णवीस आणि नितिन गडकरी हे शस्त्रधारी शिपाई बनले आहेत.
भाजपचे कार्यकारिणी पदाधिकारी आणि माजी महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरुन मुख्यमंत्री आणि केंदीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविषयी आक्षेपार्ह व्यंगचित्र पोस्ट केल्याचा प्रकार समोर आला आहे. टाकण्यात आलेल्या पोस्टमध्ये राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या राजसिंहासनावर तर मुख्यमंत्री आणि गडकरी यांना शस्त्रधारी गणवेशातील शिपाई असल्याचे "असे आपल्याला पाहिजे" या मथळ्याखाली दाखवण्यात आले आहे. लाडवंजारी हे भाजपचे सक्रिय कार्यकर्ते असल्याचे समजते.
विशेष म्हणजे या पोस्टवर अनेकांनी लाईक आणि कॉमेंट्स देखील पोस्ट केल्या असून याबाबत सोशल मीडियावर चर्चेचे वादळ उठल्याने तातडीने ही वादग्रस्त पोस्ट पेजवरून हटविण्यात आली आहे. लाडवंजारी हे महसुलमंत्री एकनाथ खडसे यांचे कट्टर समर्थक मानले जातात.
दरम्यान, अशोक लाडवंजारी यांनी याबाबत सायंकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांना तक्रार दिली. त्यात त्यांनी आपल्याला माहीती तंत्रज्ञानाची तसेच सोशल मीडियाची पुरेपूर माहिती नसल्याने आपल्या नावाने अज्ञात व्यक्तीकडून बनावट फेसबुक अकाउंट उघडून जाणीवपूर्वक नेत्यांची आणि माझी बदनामी केल्याचे नमूद केले आहे.