उष्णतेची लाट कायम, दोन बळी
By Admin | Updated: May 22, 2016 03:50 IST2016-05-22T03:50:04+5:302016-05-22T03:50:04+5:30
विदर्भ आणि खान्देशातील उष्णतेची लाट कायम असून शनिवारी उपराजधानी नागपुरात सर्वाधिक ४६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अकोला जिल्ह्यात उष्माघाताने दोघांचा बळी गेला.

उष्णतेची लाट कायम, दोन बळी
पुणे/मुंबई/नागपूर : विदर्भ आणि खान्देशातील उष्णतेची लाट कायम असून शनिवारी उपराजधानी नागपुरात सर्वाधिक ४६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अकोला जिल्ह्यात उष्माघाताने दोघांचा बळी गेला. तर खान्देशात २५० वटवाघुळांचा जीव गेला. मुंबईत ढगाळ वातावरण असले तरी जिवाची उलाघाल कायम आहे.
राज्यात गेल्या चार दिवसांपासून आलेली अतिउष्णतेची लाट शनिवारीही कायम होती. मराठवाड्यासह कोकण आणि गोवाही तापला असून या तीनही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे. विदर्भात दुपारची अघोषित संचारबंदी कायम असून जनजीवन अजूनही विस्कळीत आहे. अकोला जिल्ह्यात शनिवारी दोघांचा उष्माघाताने मृत्यू झाला. यामुळे गत चार दिवसांत जिल्ह्यातील मृतांचा आकडा आठ झाला आहे. हिवरखेड (ता. तेल्हारा) येथील शेतमजूर महिला अंजनाबाई महादेवराव बोंबटकार आणि उज्ज्वला महादेव चिकटे (४०) या अंगणवाडी सेविकेचा मृत्यू झाला.
खान्देशातही सूर्य आग ओकत आहे. दोन दिवसांच्या तुलनेत तापमान किंचित कमी झाले आहे. पाटालगत निंबाच्या झाडावर वटवाघुळे मृत्युमुखी पडल्याचे तर काही मरणासन्न अवस्थेत असल्याचे ग्रामस्थांना दिसले. येत्या २४ तासांत कोकण गोव्यासह मध्य महाराष्ट्रात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
प्रमुख शहरांमधील कमाल तापमान : अमरावती ४५.६, वर्धा ४५.५, चंद्रपूर ४५, यवतमाळ व ब्रह्मपुरी ४४.५, नांदेड ४४, अकोला ४३.८, मालेगाव ४३.६, बीड ४३.२, गोंदिया ४२.६, औरंगाबाद ४१, अहमदनगर ४०.८, वाशिम व बुलडाणा ४०.६, सोलापूर ४०.१, नाशिक ३६.८, पुणे ३५.९, डहाणू ३५.७, सातारा ३५.६, मुंबई ३५.४ आणि रत्नागिरी ३४.४.