महापौरपदाचा एक दावेदार शर्यतीबाहेर

By Admin | Updated: March 1, 2017 06:03 IST2017-03-01T06:03:51+5:302017-03-01T06:03:51+5:30

संख्याबळ अधिक असल्याने महापौरपदाचे दावेदार असलेल्या शिवसेनेला पक्षातील ज्येष्ठ नगरसेवकांनी जेरीस आणले आहे.

A contender of the Mayor's post outside the race | महापौरपदाचा एक दावेदार शर्यतीबाहेर

महापौरपदाचा एक दावेदार शर्यतीबाहेर


मुंबई : संख्याबळ अधिक असल्याने महापौरपदाचे दावेदार असलेल्या शिवसेनेला पक्षातील ज्येष्ठ नगरसेवकांनी जेरीस आणले आहे. खुल्या वर्गासाठी असलेल्या या पदाचे दावेदार अधिक असल्याने शिवसेनेची पंचाईत झाली आहे. यापैकी एक दावेदार असलेले शिवसेनेचे उपनेते यशवंत जाधव यांना गटनेतेपद देण्यात आले आहे. मात्र यामुळे महापौरपदाच्या शर्यतीतून ते पुन्हा एकदा बाद झाले आहेत.
गेली अडीच वर्षे मुंबईचे महापौरपद अनुसूचित जातीच्या महिलांसाठी आरक्षित होते. त्या वेळी यशवंत जाधव यांच्या जागेवर निवडून आलेल्या त्यांच्या पत्नी यामिनी जाधव यांचे नाव चर्चेत होते. यासाठी जाधव यांनी सर्व शक्ती पणाला लावली. मात्र जाधव यांना डावलून शिवसेनेने स्नेहल आंबेकर यांना महापौरपद दिले. महापालिका निवडणुकीत उतरवलेले काही ज्येष्ठ निवडून आल्यामुळे त्यांनी मोठ्या पदांवर दावा करण्यास सुरुवात केली आहे. यापैकी महापौरपदाच्या शर्यतीत असलेले जाधव यांच्यावर यंदा तरी पक्षश्रेष्ठींची कृपा होईल, असे वाटत होते. मात्र शिवसेनेने आपल्या सदस्यांची कोकण विभागीय आयुक्तांकडे नोंदणी करताना जाधव दाम्पत्याची पुन्हा एकदा घोर निराशा केली आहे. यशवंत जाधव यांना गटनेतेपद देण्यात आल्याने शिवसेना सत्तेत आल्यास ते सभागृह नेता होतील. मात्र शिवसेनेची संधी हुकली तर ते विरोधी पक्षनेते ठरतील. त्यामुळे महापौरपदाच्या शर्यतीतून ते आपोआपच बाहेर फेकले गेले आहेत. १९९७ पासून ते शिवसेनेत असून तिसऱ्यांदा नगरसेवकपदी निवडून आले आहेत. त्यांच्या पत्नीही या वेळेस निवडणुकीच्या रिंगणात होत्या.
मात्र यामिनी जाधव यांना
पराभवाचा सामना करावा लागला आहे. (प्रतिनिधी)
>नगरसेवकांमध्ये चुरस
महापौरपद या वेळेस खुले असल्याने शिवसेनेतील बड्या नगरसेवकांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. यामध्ये पुरुष नगरसेवकच नव्हे तर महिला नगरसेवकांनीही जोर लावला आहे. पुरुष नगरसेवकांमध्ये मंगेश सातमकर, विश्वनाथ महाडेश्वर, रमेश कोरगावकर, रमाकांत रहाटे यांच्यात महापौरपदासाठी रस्सीखेच आहे. तर महिलांमध्ये माजी आमदार आणि माजी महापौर विशाखा राऊत, राजूल पटेल, शुभदा गुडेकर, किशोरी पेडणेकर यांच्यात स्पर्धा आहे.
>सेनेचे संख्याबळ ८८
महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे ८४ तर भाजपाचे ८२ नगरसेवक निवडून आले आहेत. सत्ता स्थापनेसाठी ११४ हा जादुई आकडा गाठणे दोन्ही पक्षांना अद्याप शक्य झालेले नाही. तरीही प्रतिष्ठेच्या महापौरपदासाठी शिवसेनेची धडपड सुरू असून चार अपक्षांचे बळ मिळवण्यात त्यांना यश आले आहे.
महापौरपदासाठी भाजपाही उत्सुक असल्याने सदस्यांची फोडाफोडी होऊ शकते. त्यामुळे आपल्या सदस्यांची तत्काळ नोंदणी करण्यासाठी शिवसेनेने आज कोकण विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली. शिवसेनेकडे पाच अपक्षांचे समर्थन असल्याचा दावा करण्यात येत असला तरी आज ८८ सदस्यांचीच नोंदी झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांनीही अनुक्रमे त्यांच्या ३१ आणि ९ सदस्यांची स्वतंत्र नोंदणी केली आहे.

Web Title: A contender of the Mayor's post outside the race

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.