‘समकालीन’ कलेचे उलगडले पैलू !
By Admin | Updated: September 14, 2015 09:17 IST2015-09-14T02:41:42+5:302015-09-14T09:17:17+5:30
कलाकार नेहमी एका कलाजगाच्या विचारचौकटीत काम करीत असतो. म्हणून त्यात जगाचे संकेत तो मानून चालत असतो

‘समकालीन’ कलेचे उलगडले पैलू !
मुंबई : कलाकार नेहमी एका कलाजगाच्या विचारचौकटीत काम करीत असतो. म्हणून त्यात जगाचे संकेत तो मानून चालत असतो. पण त्याच वेळेला प्रत्येक कलाकार आपल्या कामांनी ही विचारांची चौकट घडवतही असतो. ही विचारांची चौकट विकसित करणे, जास्त प्रगल्भ करण्याचे काम कलाकार करतो. या माध्यमातून आपल्या काळाची आणि जागेची विशिष्ट समकालीन जाणीव घडत असते. मात्र ‘समकालीन’ कलेला सीमित न ठेवता तिचा विचार सापेक्षपणे केला पाहिजे, असे मत कला क्षेत्रातील तज्ज्ञांनी मांडले.
‘श्लोक’ - रिथिंकिंग द रिजनल आणि ‘राष्ट्रीय आधुनिक कलासंग्रहालय’ आयोजित ‘समकालीन असणे’ हा परिसंवाद शनिवारी राष्ट्रीय आधुनिक कलासंग्रहालयाच्या आॅडिटोरिअम येथे पार पडला. परिसंवादात ‘प्रादेशिक केंद्रे आणि कलेतील समकालीनतेच्या प्रश्नांचा वेध’ या विषयावर विचारमंथन करण्यात आले. या परिसंवादाची संकल्पना सुधीर पटवर्धन यांची असून, याप्रसंगी ‘श्लोक’च्या संस्थापिका आणि मुख्य प्रवर्तक शीतल दर्डा, ‘लोकमत’चे सहायक संपादक अतुल कुलकर्णी, वसंत डहाके, मकरंद साठे, शांता गोखले, अभिजित रणदिवे, अभय सरदेसाई, दीपक कन्नल, अभिजित ताम्हाणे, रणजीत होस्कोटे, मनीषा पाटील, दिलीप रानडे, शुक्ला सावंत, दीपक घारे, पोपट माने, माधव इमर्ते, नूपुर देसाई, सुधाकर यादव, बाळासाहेब पाटील, रुचा कुलकर्णी, संध्या बोरवडेकर, नॅन्सी अदाजनिया आदी मान्यवर उपस्थित होते. ‘रिथिंकिंग दि रिजनल’ प्रदर्शनाचे एक्झबिर्या डेव्हलपर्स आणि सिद्धिटेक ग्रुप हे या प्रदर्शनाचे अनुक्रमे मुख्य व सहप्रायोजक आहेत.
यावेळेस महानगरीय आणि प्रादेशिक कलाजाणिवा, कलेतील समकालीनतेची परिभाषा, अॅकॅडेमिझम आणि रिअॅलिझम यांची तुलना, कलाविद्यार्थी आणि कलाकारांसमोरील प्रश्न, कलाशिक्षणाची सद्य:स्थिती, कला क्षेत्रातील नवीन वाटा शोधण्याचे प्रयत्न अशा विविध विषयांवर सहभागी झालेल्या तज्ज्ञांनी मते मांडली. चाकोरी मोडून यश मिळविलेल्या प्रभाकर पाचपुते, स्मिता राजमाने आणि संदीप पिसाळकर या विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केले. कला राष्ट्रीय-आतंरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी स्वत:च्या कलेचा शोध घेणे महत्त्वाचे असते, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावले.
कला इतिहासाच्या
अभ्यासात सुसूत्रता नाही
कलाशिक्षणाच्या अभ्यासक्रमात प्राधान्याने बदल करण्याची गरज आहे. कला इतिहासाच्या अभ्यासात सुसूत्रता नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवण्यास अडथळे येतात. शिवाय, माहिती तंत्रज्ञानाचे क्षेत्र कितीही विस्तारले असले तरी प्रत्यक्ष कला व्यवहारातून येणारा अनुभव महत्त्वाचा असतो. कलाविश्वाचा गांभीर्याने विचार करून ‘श्लोक’ने आयोजित केलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून, राज्यभरातील प्रादेशिक केंद्रांवर अशा प्रकारचे परिसंवाद, कार्यशाळांचे आयोजन केले पाहिजे.
- नूपुर देसाई
प्रादेशिक अभिरुची समृद्ध करण्याची गरज
प्रादेशिकतेचा पुनर्विचार करताना पहिल्यांदा प्रादेशिक अभिरुची समृद्ध करण्याची गरज आहे. सध्या प्रादेशिक स्तरावरील कलाजाणिवा दयनीय अवस्थेत आहेत. ही कलाजाणिवा समृद्ध होण्यासाठी चित्रकार, शिल्पकार अशा कलाकारांनीच पुढाकार घेतला पाहिजे. राज्यातील कला शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये ‘श्लोक’ने विद्यार्थ्यांचे विचार घडविण्यासाठी भविष्यातही असे उपक्रम राबविले पाहिजेत. - माधव इमर्ते
भविष्यातील पिढीसाठी स्तुत्य उपक्रम
प्रादेशिकतेचा पुनर्विचार हा स्तुत्य उपक्रम असून, कला शाखेतील भविष्यातील पिढीसाठी अधिक उपयोगाचा आहे. या माध्यमातून कला शाखेतील तज्ज्ञ आणि विद्यार्थ्यांचे नव्या-जुन्या विचारांचे आदानप्रदान झाले. शिवाय, यामुळे चित्रकलेची परंपराही सर्वांसमोर आली. महाराष्ट्रातील प्रमुख ठिकाणी अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत. जेणेकरून, कलाशिक्षणातील मतांतरे सर्वांसमोर येतील, आणि त्यात प्रबोधनात्मक बदल घडतील. - वसंत डहाके
विचारांच्या आदानप्रदानाची गरज
कलाक्षेत्र हे केवळ कॅनव्हासपुरते मर्यादित न राहता त्याविषयी चर्चा, विचारांचे आदान-प्रदान होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सध्या हे क्षेत्र स्थित्यंतराच्या टप्प्यातून जात असताना याविषयी कला क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विद्यार्थ्यांनी मते मांडली पाहिजेत. याकरिता, कोणती यंत्रणा पुढाकार घेईल यापेक्षा कलाकार विश्वातील मंडळीनींच पुढाकार घेऊन अशा प्रकारे कार्यक्रम केले पाहिजेत. ‘श्लोक’ने आयोजित केलेला हा उपक्रम भविष्यात या क्षेत्रात होणाऱ्या बदलांसाठी सकारात्मक ठरेल, हे निश्चित.
- शांता गोखले
देशाच्या वैविध्याने नटलेल्या संस्कृतीच्या आविष्कारास व्यासपीठ मिळवून देण्याचा श्लोकचा प्रयत्न आहे. उदयोन्मुख कलावंतांना पुढे आणून त्यांची कला जगापुढे आणण्याच्या हेतूने ‘श्लोक’ची स्थापना करण्यात आली. गतकाळातील महाराष्ट्रीय कलांच्या मनोवेधक चित्रणातून राज्यातील विविधताच प्रतिबिंबित होते. हा शो महाराष्ट्रातील कलाकारांना ते व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न करणारे पहिले पाऊल आहे.
- शीतल दर्डा, श्लोकच्या संस्थापिका
कलाशिक्षणातील त्रुटी दूर होतील
श्लोक’च्या माध्यमातून मला अशा प्रकारच्या चर्चासत्रात मते मांडायला मिळाली याचा आनंद आहे. या चर्चासत्रामुळे कला महाविद्यालयातील अनेक समस्या सोडवता येतील; आणि यातील विषय विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देईल. - शुक्ला सावंत
परिसंवादाचे दस्तावेजीकरण व्हावे
कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी राबवलेला हा आगळावेगळा उपक्रम या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरेल. ‘श्लोक’च्या माध्यमातून अशा प्रकारचे चर्चासत्र करण्याची इच्छा पूर्ण झाली. अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत आजचे हे चर्चासत्र पोहोचविण्यासाठी या कार्यक्रमाचे दस्तऐवजीकरण केले पाहिजे. जेणेकरून, भविष्यातही कला शाखेतील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना या माध्यमातून मार्गदर्शन मिळेल. - दीपक घारे
श्लोकमधून सक्षम पिढी घडविण्याची प्रेरणा मिळाली
कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अशा प्रकारची संधी पहिल्यांदाच मिळाली.
‘श्लोक’च्या माध्यमातून कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी अनेक कार्यक्रम राबवण्याची इच्छा आहे. जेणेकरून, भविष्यात वेळोवेळी या क्षेत्रातील त्रुटी दूर करून सक्षम पिढी घडेल. - सुहास बहुळकर
कॉलेजच्या चार भिंतींत मिळणारे शिक्षण वेगळे असते. मात्र या परिसंवादाच्या माध्यमातून कलेबद्दलचे अनेक पैलू समोर आले. भविष्यात या क्षेत्रात करिअर करण्यासाठी याचा नक्की उपयोग होईल. ‘श्लोक’ने भविष्यातही अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत. - एकता असरानी, एस.एन.डी.टी. कला महाविद्यालय
कला क्षेत्रातील सगळ्यांना पहिल्यांदाच एकत्र प्लॅटफॉर्म मिळाला. सगळ्या कलाकारांना ‘श्लोक’ने एकत्र आणले. राज्यातील छोट्या खेडोपाड्यांत अशा प्रकारचे कार्यक्रम झाल्यास तेथील स्थानिक कलाकारांना यातून काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा मिळेल. या कार्यक्रमाच्या माध्यमातून कलेचे वास्तव समोर आले. - हिमानी, एस.एन.डी.टी. कला महाविद्यालय
अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी असूनही हा परिसंवाद विचारांना दिशा देण्यासाठी उपयुक्त ठरला. या माध्यमातून निश्चितच कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. केवळ कला महाविद्यालये नव्हे, तर सर्वच संस्था आणि शाळांमध्ये असे उपक्रम राबविल्यास शालेय वयापासून कला क्षेत्राबद्दल सशक्त विचार होण्यास सुरुवात होईल. - अक्षय टकले, गर्व्हमेंट पॉलिटेक्निकल महाविद्यालय, पुणे
महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांत जाऊन कलाकारांना एकत्रित करण्याचा ‘श्लोक’चा उत्तम प्रयत्न होता. अनेक नवीन कलाकारांना यामुळे सर्वांसमोर येण्याची संधी मिळाली. अनेक विद्यार्थी एकत्र आले. कला संस्थेतील अनेकांनी यासारख्या कार्यक्रमांचे अधिकाधिक आयोजन करावे. - स्मिता राजमाने