वीजग्राहकांनो, पावसाळ्यात खबरदारी घ्या...
By Admin | Updated: June 7, 2016 07:43 IST2016-06-07T07:43:06+5:302016-06-07T07:43:06+5:30
वीजग्राहकांनी मीटर बॉक्स, वायरिंग इत्यादी व्यवस्थितरित्या आहे की नाही? याची तपासणी करून घ्यावी.

वीजग्राहकांनो, पावसाळ्यात खबरदारी घ्या...
मुंबई : ऐन पावसाळ्यात शॉर्टसर्किटमुळे दुर्घटना घडण्याचे प्रमाण अधिक असते. अशावेळी वीजेच्या दुर्घटना घडू नयेत म्हणून वीजग्राहकांनी मीटर बॉक्स, वायरिंग इत्यादी व्यवस्थितरित्या आहे की नाही? याची तपासणी करून घ्यावी. आणि काही दोष आढळल्यास त्याची दुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहन वीज पुरवठा करणाऱ्या टाटा पॉवर आणि रिलायन्स या वीज कंपन्यांनी ग्राहकांना केले आहे.
आपल्या इमारतीचा अथवा चाळीचा मीटर बॉक्स पाणी साचण्याच्या ठिकाणावरून उंचीवर आहे का? हे तपासून घ्यावे. परवानाधारक इलेकट्रीकल कंत्राटदाराकडून इमारत अथवा चाळीची वायरिंग तपासावी. वीज मीटर अथवा तत्सम साहित्याला ओल्या हाताने स्पर्श करू नये. शिवाय वीजमीटर तपासताना खबरदारी म्हणून हातमोजांचा वापर करा. वीज मीटर बॉक्सवर लोड येणार नाही, याची खबरदारी घ्या. एखादी दुर्घटना घडल्यास कंपनीच्या नियंत्रण कक्षाला त्याची त्वरित माहिती द्या, असे आवाहन वीज कंपन्यांनी केले आहे. विशेष म्हणजे वीजेसंदर्भातील एखादी दुर्घटना घडल्यास त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी रिलायन्सकडून आपत्कालीन व्यवस्थापन प्रतिसाद पथकही तैनात ठेवण्यात येणार आहे. तर दोन्ही कंपन्यांनी ग्राहकांसाठी हेल्पलाईन क्रमांकही दिले असून, दुर्घटना घडल्यास संबंधित क्रमांकावर मदत मागता येणार आहे. (प्रतिनिधी)
>हेल्पलाईन क्रमांक : १८००२०९५१६१ (टाटा पॉवर), १८००२००३०३० (रिलायन्स इन्फ्रा)