आमदारांनाही सापडेनात बांधकाम मुख्य अभियंता
By Admin | Updated: August 3, 2014 00:51 IST2014-08-03T00:51:31+5:302014-08-03T00:51:31+5:30
सार्वजनिक बांधकाम खात्यातील प्रत्येकालाच मुख्यालयी राहण्याची सक्ती केली जात असली तरी प्रत्यक्षात या खात्याचे मुख्य अभियंताच नेहमी मुख्यालयी गैरहजर राहत असल्याचा प्रकार उघडकीस आला.

आमदारांनाही सापडेनात बांधकाम मुख्य अभियंता
मुख्यालयी दांडी : बैठकांच्या नावाने मुंबईतच बस्तान, अमरावती विभागाची अवस्था
यवतमाळ : सार्वजनिक बांधकाम खात्यातील प्रत्येकालाच मुख्यालयी राहण्याची सक्ती केली जात असली तरी प्रत्यक्षात या खात्याचे मुख्य अभियंताच नेहमी मुख्यालयी गैरहजर राहत असल्याचा प्रकार उघडकीस आला. ते मुंबईतूनच अमरावतीचा कारभार सांभाळतात. आता तर ते आमदारांनाही मिळेनासे झाले आहेत. आमदारांना त्यांच्या भेटीशिवाय परत जावे लागत आहे.
विधानसभा निवडणुका आॅक्टोबरमध्ये होऊ घातल्या आहेत. १५ आॅगस्टनंतर कोणत्याही क्षणी आचारसंहिता जारी होणार आहे. त्यामुळे विकास कामे वेगाने निकाली काढण्यासाठी आमदार व राजकीय कार्यकर्त्यांची धडपड सुरू आहे. बहुतांश कामे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित येत असल्याने तेथील अभियंत्यांशी आमदार व त्यांचे पीए सतत संपर्कात असतात.
अनेकदा कनिष्ठ स्तरावरील अभियंत्यांकडून प्रतिसाद न मिळाल्यास वरिष्ठांकडे तक्रार केली जाते. परंतु तक्रार नोंदविण्यासाठी मुख्य अभियंता पी. एस. मंडपे अमरावतीत उपलब्धच राहत नसल्याची राजकीय गोटातील ओरड आहे.त्यामुळे आमदारांनाही परत जावे लागते.
दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या एका आमदाराला याचा प्रत्यय आला. कंत्राटदार, अन्य लोकप्रतिनिधी व सामान्य नागरिकांच्यासुद्धा अशाच तक्रारी आहेत. थेट बांधकाम मंत्रालयच ‘खूश’ असल्याने मंडपे आता कुणालाही जुमानत नाहीत. अन्य काही अभियंतेही आता त्यांचाच कित्ता गिरवित आहेत.
‘लोकमत’ने मंडपेंच्या कारभारावर वृत्त प्रकाशित केले होते. अमरावतीला नियुक्ती झाल्यापासून मंडपे नेमके किती दिवस हजर आहेत, याच्या तारखाच या वृत्तातून जाहीर केल्या होत्या.
हे सिक्रेट मिडियाच्या हाती गेले कसे म्हणून मंडपेंनी तीन अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. हे तिघे जुन्या साहेबांचे निकटवर्तीय समजून त्यांच्यावर हा सूड उगविला गेला होता. वास्तविक त्या तारखांशी या तिघांचा दुरान्वयेही संबंध नव्हता. (जिल्हा प्रतिनिधी)