राज्यघटनाच सर्वश्रेष्ठ धर्मग्रंथ
By Admin | Updated: April 5, 2015 00:48 IST2015-04-05T00:48:42+5:302015-04-05T00:48:42+5:30
जिथे मानवी हक्कांचा विचार होतो, तिथे भारतीय राज्यघटना जगातील सर्वश्रेष्ठ ठरते, असे मत ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.

राज्यघटनाच सर्वश्रेष्ठ धर्मग्रंथ
जब्बार पटेल : डीएसके गप्पांमध्ये मांडली दिलखुलास मते
पुणे : देशातील सर्व धर्मग्रंथांपेक्षा राज्यघटना हाच सर्वश्रेष्ठ धर्मग्रंथ आहे. यामध्ये सर्व धर्मांतील नागरिकांना स्वातंत्र्य देण्यात आले आहे. जिथे मानवी हक्कांचा विचार होतो, तिथे भारतीय राज्यघटना जगातील सर्वश्रेष्ठ ठरते, असे मत ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.
डी. एस. कुलकर्णी फाउंडेशनतर्फे आयोजित ‘डीएसके गप्पा’ कार्यक्रमात त्यांनी आपली मते दिलखुलासपणे मांडली. ‘मी उभा आहे’ या पहिल्या नाटकापासून ते अशी पाखरे येती, सामना, सिंहासन या अजरामर कलाकृतींच्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला. तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व यशवंतराव चव्हाण यांच्यावरील चित्रपटांबाबतही त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. राजेश दामले व राज काझी यांनी त्यांच्याशी संवाद साधला. पटेल म्हणाले, की चरित्रपट निर्माण करताना एखाद्या व्यक्तीबद्दल माहिती देणे एक आव्हान असते. डॉ. आंबेडकर हे तर विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी देशाला दिलेली सर्वश्रेष्ठ राज्यघटना सर्व घटकांतील नागरिकांना न्याय देणारी आहे. यशवंतराव चव्हाण यांचा जीवनपट मांडणेही सोपे नव्हते.
नाट्य व चित्रपटसृष्टीतील प्रवासाविषयी भरभरून बोलताना पटेल म्हणाले, की वयाच्या बाराव्या वर्षी आचार्य अत्रे यांच्या ‘मी उभा आहे’ या नाटकातून रंगभूमीवर प्रवेश केला. त्या वेळी पहिल्याच वाक्याला मिळालेल्या टाळ््यांनी रंगभूमीवर काम करण्यास प्रेरित केले. त्यानंतर कॉलेज जीवनात नाटके सुरूच राहिली. पुण्यात वैद्यकीय शिक्षणासाठी आल्यानंतर डॉ. श्रीराम लागू यांच्या सहवासामुळे नाट्य क्षेत्रात जणू मिसळून गेलो. माणूस नावाचं बेटं, घाशीराम कोतवाल, श्रीमंत, अशी पाखरे येती, खून पाहावा करून या नाटकांबरोबरच सामना, सिंहासन, जैत रे जैत, मुक्ता हे चित्रपट आयुष्यातील माईलस्टोन ठरले.
विजय तेंडुलकर, पु. ल. देशपांडे आणि डॉ. लागू हे आपले दैवत असल्याचे पटेल यांनी सांगितले. १९७२ मध्ये सोडलेली अभिनयाची वाट पुन्हा धरणार नसल्याचेही पटेल यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
४‘अशी पाखरे येती’ या नाटकाचा हिंदी चित्रपट म्हणजे ‘मुसाफिर’. रेखा आणि नसरुद्दीन शहा यांच्यावर १९८६ मध्ये चित्रित झालेला हा चित्रपट निर्मात्यांमधील वाद, तसेच रीळ खराब झाल्याने पडद्यावर येऊ शकला नव्हता. मात्र, ही खराब झालेली रीळ पुन्हा पहिल्यासारखी किंबहुना अधिक चांगली करण्यात यश आली आहे. त्यामुळे लवकर हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येणार आहे. चित्रपटगृहांमध्ये येईल की नाही, हे स्पष्ट नसले तरी दूरचित्रवाणीवर पे्रक्षकांना हा चित्रपट पाहता येईल, असे जब्बार पटेल यांनी सांगितले.