भाजपमधूनच मुख्यमंत्र्यांना अस्थिर करण्याचे कारस्थान - उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2016 08:09 IST2016-08-05T08:09:23+5:302016-08-05T08:09:23+5:30

शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून स्वतंत्र विदर्भाची मागणी करणा-या भाजप नेत्यांना चांगलेच फटकारले आहे.

The conspiracy of destroying Chief Minister from BJP - Uddhav Thackeray | भाजपमधूनच मुख्यमंत्र्यांना अस्थिर करण्याचे कारस्थान - उद्धव ठाकरे

भाजपमधूनच मुख्यमंत्र्यांना अस्थिर करण्याचे कारस्थान - उद्धव ठाकरे

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ५ - शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून स्वतंत्र विदर्भाची मागणी करणा-या भाजप नेत्यांना चांगलेच फटकारले आहे. विधिमंडळाच्या अधिवेशन काळात स्वतंत्र विदर्भाची मागणी करणे हे मुख्यमंत्र्यांना अस्वस्थ आणि अस्थिर करण्याचे कारस्थान आहे असा आरोप उद्धव यांनी केला आहे. भाजपमधील काही लोक मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हे कारस्थान करीत नाही ना ? असा संशयही उद्धव यांनी व्यक्त केला आहे. 
 
भारतीय जनता पक्षाची भूमिका लहान राज्यांची आहे. अजेंडा’ वगैरे असल्याचा झेंडा फडकवला जात आहे. तसे अनेक अजेंडे व झेंडे भूमिका म्हणून भाजपने फडकवलेच आहेत. कश्मीरबाबत जो मूळ अजेंडा होता त्याचे काटेकोर पालन झाले आहे काय व कश्मीरची आज जी दुरवस्था भाजपच्याच राज्यात सुरू आहे त्यास काय म्हणता येईल?
 
राममंदिर, समान नागरी कायदा हा ज्याप्रमाणे भाजपच्या अजेंड्यावर होता व आता तो राजकीय सोयीसाठी गुंडाळून ठेवला आहे त्याचप्रमाणे विदर्भाचा किंवा महाराष्ट्र तोडण्याचा ‘अजेंडा’ही या मंडळींनी गुंडाळून ठेवला पाहिजे असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. मी अखंड महाराष्ट्राचाच मुख्यमंत्री आहे व राहणार अशी ठाम भूमिका घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कौतुक करण्यात आले आहे. 
 
काय म्हटले आहे सामनाच्या अग्रलेखात 
- विधानसभेत अखंड महाराष्ट्राचा ठराव आणण्यावरून आता जे कवित्व सुरू झाले आहे त्या कवितांचे तुषार ज्यांना उडवायचेत त्यांना उडवू द्या. महाराष्ट्राच्या विधानसभेत अखंड महाराष्ट्राच्या विरोधात एकही मत पडू नये व माकडांच्या हाती आयतेच कोलीत मिळू नये या मताचे आम्ही आहोत. शिवरायांचा हा महाराष्ट्र अखंड राहील. जे अंगावर येतील त्यांना शिंगावर घेऊन आपटल्याशिवाय राहणार नाही. ‘आम्ही अखंड महाराष्ट्राचे व अखंड महाराष्ट्र आमचा’ हे नाते अतूट आहे. 
 
- महाराष्ट्र अखंड आहे व अखंडच राहील, अखंड महाराष्ट्राच्या प्रश्‍नी शिवसेना आपले इमान राखील याची जाण राज्यातील ११ कोटी मराठी जनांस नक्कीच आहे. विदर्भातील काही असंतुष्ट राजकीय कावळे या प्रश्‍नी ‘काव काव’ करून गोंधळ घालीत असले तरी अशा कावळ्यांची शाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरू दिली नाही. मी अखंड महाराष्ट्राचाच मुख्यमंत्री आहे व राहणार अशी ठाम भूमिका त्यांनी मांडल्यामुळे या कावळ्यांची पिसे झडून गेली. आम्हाला तर असे वाटते की, मुख्यमंत्र्यांना अस्थिर व अस्वस्थ करण्याचे हे कारस्थान तर कोणी पडद्यामागून करीत नाही ना? व त्यासाठी विदर्भ मुद्द्याचा फुसका आपटीबार फोडून ‘लांडगा आला रे आलाऽऽ’ची बोंबाबोंब तर केली जात नाही ना? भारतीय जनता पक्षात काही अशांत लोक विधिमंडळाचे अधिवेशन आले की या प्रश्‍नी हाकारे हुकारे देऊन मुख्यमंत्र्यांना अस्थिर करणार्‍या गुदगुल्या करीत असतात. अर्थात कोणी कितीही काव काव आणि कोल्हेकुई केली तरी जोपर्यंत शिवसेना आहे तोपर्यंत महाराष्ट्राचा एक कपचाही उडवला जाणार नाही. 
 
- भारतीय जनता पक्षाची भूूमिका लहान राज्यांची असल्याचे यानिमित्ताने बोलले जाते. अशी राज्ये प्रशासकीय दृष्टीने बरी पडतात असे या मंडळींना वाटते, पण तुलनेत लहान असलेल्या हरयाणा राज्यात आज बरे चालले आहे काय? अरुणाचलसारख्या लहान राज्यात जो तमाशा व वस्त्रहरण झाले तो काय उत्तम प्रशासनकौशल्याचा नमुना म्हणावा का? ज्याप्रमाणे लहान राज्यांची भूमिका हा आपला ‘अजेंडा’ वगैरे असल्याचा झेंडा फडकवला जात आहे. तसे अनेक अजेंडे व झेंडे भूमिका म्हणून भाजपने फडकवलेच आहेत. कश्मीरबाबत जो मूळ अजेंडा होता त्याचे काटेकोर पालन झाले आहे काय व कश्मीरची आज जी दुरवस्था भाजपच्याच राज्यात सुरू आहे त्यास काय म्हणता येईल? राममंदिर, समान नागरी कायदा हा ज्याप्रमाणे भाजपच्या अजेंड्यावर होता व आता तो राजकीय सोयीसाठी गुंडाळून ठेवला आहे त्याचप्रमाणे विदर्भाचा किंवा महाराष्ट्र तोडण्याचा ‘अजेंडा’ही या मंडळींनी गुंडाळून ठेवला पाहिजे. 
 
- बेळगाव-कारवारसह २० लाखांचा मराठी सीमा भाग महाराष्ट्रात येण्यासाठी ज्याप्रकारे तडफडत आहे त्यावर यापैकी एकही कावळा काव काव करायला तयार नाही. ‘‘योग्य वेळी विदर्भ वेगळा करू’’, असे भाजपचे ‘प्रांतिक’ अध्यक्ष सांगतात, पण योग्य वेळी बेळगाव-कारवारसह मराठी भाग महाराष्ट्रात आणून दाखवूच अशी गर्जना त्यांनी केली असती तर महाराष्ट्राशी इमान राखले असे म्हणता आले असते, पण विदर्भाच्या प्रश्‍नावरची माती उकरून स्वपक्षाच्या सरकारला व आपल्याच मुख्यमंत्र्यांना खड्ड्यात टाकण्याचे हे प्रयोग अंगलट आल्याशिवाय राहणार नाहीत. भारतीय जनता पक्षाच्या ज्या काही भूमिका असायच्या त्या असतीलच. त्या भूमिका राष्ट्रनिष्ठ व महाराष्ट्रवादी असतील तर आम्ही त्यांचे स्वागतच करू, पण महाराष्ट्रविरोधाचा किडा तिथे वळवळताना दिसला तर त्यांच्या राजकीय भूमिकांचे ओझे आम्ही फेकून देऊ. 
 

Web Title: The conspiracy of destroying Chief Minister from BJP - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.