ज्ञानोबा-तुकोबांचा समाज तोडण्याचे षडयंत्र
By Admin | Updated: May 28, 2015 00:44 IST2015-05-28T00:44:46+5:302015-05-28T00:44:46+5:30
सध्या महाराष्ट्रात ज्ञानोबा-तुकोबांचा समाज तोडण्याचे षड्यंत्र चालू आहे. हा समाज तुटला तर महाराष्ट्र रसातळाला जाईल,

ज्ञानोबा-तुकोबांचा समाज तोडण्याचे षडयंत्र
पुणे : सध्या महाराष्ट्रात ज्ञानोबा-तुकोबांचा समाज तोडण्याचे षड्यंत्र चालू आहे. हा समाज तुटला तर महाराष्ट्र रसातळाला जाईल, असे स्पष्ट करीत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी ‘मराठ्यांचा इतिहास’ जातीपातीत नेला तर अहिष्णू, हिंसक समाजाला तोंड द्यावे लागेल, असा गर्भित इशाराहीदिला.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या १०९व्या वर्धापनदिनानिमित्त बुधवारी निवारा सभागृहात समारंभ झाला. त्यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा सन्मान पुरस्कार ज्येष्ठ कादंबरीकार रंगनाथ पठारे यांना व भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार मधू नेने यांना देऊन गौरविण्यात आले. याशिवाय राजा फडणीस पुरस्कृत उत्कृष्ठ मसाप शाखा फिरता करंडक मसापच्या सासवड शाखेस प्रदान करण्यात आला. तर श्यामराव पाटील आणि पद्माकर कुलकर्णी मसाप कार्यकर्ता पुरस्काराचे मानकरी ठरले.
धर्माधिकारी म्हणाले, संत ज्ञानेश्वर ते कवी ग्रेसांपर्यंत मराठी भाषेतील राकट आणि कोमलपणा दिसला आहे. मराठी जतन करायची असेल तर नव्याची कास धरावी लागेल. जीवनाच्या सर्व क्षेत्रात मराठी भाषेचा ठसा उमटला तर ती नक्कीच समृद्ध होईल. मराठीला अभिजाततेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न होत आहेत, पण मुळातच मराठी अभिजातच आहे. प्रतिभावंत माणसे निपजली म्हणूनच मराठी भाषा समृद्ध झाली.
सत्काराला उत्तर देताना रंगनाथ पठारे म्हणाले, मराठी भाषेच्या ऱ्हासासाठी राज्यकर्त्यांपेक्षा सामान्यजनच जबाबदार आहेत.
प्रास्ताविक प्रकाश पायगुडे, सूत्रसंचालन डॉ. कल्याणी दिवेकर यांनी केले. (प्रतिनिधी)
पठारेंना ज्ञानपिठ मिळावे
४प्रा. पठारे हे मराठी साहित्यातील ज्येष्ठ साहित्यिक आहेत, असे सांगत धर्माधिकारी यांनी यावेळी पठारे यांना ‘ज्ञानपिठ पुरस्कारा’ने सन्मानित करावे अशी इच्छा व्यक्त केली. इतकेच नव्हे तर तांम्रपटच्या ताकदीच्या कादंबरीला ‘नोबेल पुरस्कार’ मिळावा असे ही सांगितले. यामध्ये कोणत्याही मराठी साहित्यिकाने खोडा घालूनये असे बोलून कानही टोचले.
नातीला प्रवेश नाकारला
४ज्येष्ठ साहित्यिक प्रा.रंगनाथ पठारे यांच्या नातील भगवत गीतेतील अध्याय येत नसल्याने ज्ञानप्रबोधीनी शाळेने प्रवेश नाकारल्याची जाहीर खंत आज पठारे यांनी बोलून दाखवली. ते म्हणाले, जो अध्याय आज्याला येत नाही, बापाला येत नाही तो चार वर्षाच्या पोरीला कसा येणार अशीही टिपणी त्यांनी यावेळी केली.