युतीची बोलणी बेकीकडे
By Admin | Updated: January 20, 2017 00:01 IST2017-01-20T00:01:43+5:302017-01-20T00:01:43+5:30
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपाची युती व्हावी

युतीची बोलणी बेकीकडे
यदु जोशी,
मुंबई- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपाची युती व्हावी, अशी फार इच्छा असल्याचे बोलले जात असले तरी दोन्ही नेत्यांवर युती न करण्याबाबत स्वपक्षीयांकडून वाढत असलेला दबाव आणि युती झाल्यास संभवणारी प्रचंड बंडखोरी लक्षात घेता वेगळे लढण्याकडेच आता वेगाने पाऊले पडत असून युती होण्याची शक्यता क्षणागणिक संपुष्टात येत आहे.
भाजपाने युतीमध्ये २२७ पैकी ११४ जागा मागितल्या असून त्यात लालबाग, परळ, दादर, माटुंगा, माहीम, वरळी या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील जागांही मागितल्याने सेनेच्या तंबूत अस्वस्थता आहे.
ठाकरे यांनी आज पत्र परिषद घेऊन मुंबईसाठी शिवसेनेचा वचननामा जाहीर करीत भाजपावर कुरघोडी केली आणि एकप्रकारे स्वबळावर लढणार असल्याचे संकेत दिले, असे म्हटले जात आहे. शिवसेनेने २२७ जागांची उमेदवार यादी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आणले आहे.
दुसरीकडे भाजपाच्या सांसदीय मंडळाची आज प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन सर्व २२७ जागांसाठीची उमेदवार यादी तयार करण्याचे काम सुरु करण्यात आले. या
बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री पीयूष गोयल, शिक्षण मंत्री विनोद तावडे, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ.आशिष शेलार आदी उपस्थित होते. मुंबईतील लोकसभेच्या सहापैकी तीन मतदारसंघांमधील उमेदवारांची यादी आज नक्की करण्यात आली, असे समजते.
>दोन्ही पक्षांतील नेते, पदाधिकाऱ्यांची भूमिका
युती झाली तर प्रचंड बंडखोरी होईल. तसेच एकमेकांचे उमेदवार पाडापाडीचे प्रकार घडतील.
युती झाली नाही तर आम शिवसैनिक त्वेषाने प्रचार करतील, युती झाली तर त्यांच्यात शैथिल्य येईल, असे मानणारा मोठा वर्ग शिवसेनेत आहे.
युती झाली तर मनसेला
ताकद मिळेल. मनसे आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या
गळाला सेना-भाजपाचे
बंडखोर उमेदवार लागतील.
युती झाली नाही तर
दोन्ही पक्षांच्या जागा
वाढतील.उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या आमच्या नेत्यांविरुद्ध वाट्टेल तशी टीका करणारे आशिष शेलार यांच्याबरोबर चर्चाच करू नका, असा आग्रह अनेक शिवसेना पदाधिकारी, शाखाप्रमुखांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे धरला आहे.भाजपाने शिवसेनेकडे ११४ जागा मागितल्या आहेत पण गेल्यावेळी भाजपाने लढलेल्या ६३ जागा, अधिक रिपाइंला देण्यात आलेल्या २८ जागा अशा एकूण ९३ जागा होतात. शिवसेना कोणत्याही परिस्थितीत ८५ ते ९० पेक्षा जास्त जागा भाजपाला सोडू शकते. त्यातूनच रिपाइंला भाजपाने जागा द्याव्यात असे शिवसेनेचे म्हणणे असल्याचे सूत्रांनी सांगितले.शिवसेनेचे नेते, मुंबईतील पदाधिकारी, शाखाप्रमुख, नगरसेवक यापैकी कोणीही युती करावी, या मताचे नाही. फक्त शिवसेनेच्या तीनचार मंत्र्यांचा युतीसाठी आग्रह आहे.
>तसे पहिलेच मुख्यमंत्री...
राज्यात आपली सत्ता असली तरी मुंबईत मराठी माणसासाठी शिवसेनाच पाहिजे, असे आजवरच्या काँग्रेसच्या बहुतेक मुख्यमंत्र्यांना वाटायचे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला सहानुभूती मिळावी, अशी विधाने त्यांच्याकडून केली जात आणि त्याचा फायदा शिवसेनेला मिळत गेला. ‘मुंबई महापालिका निकालानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अस्तित्व संपेल’असे विधान गेल्या निवडणुकीत मतदानाला काहीच दिवस बाकी असताना तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आणि शिवसैनिक पेटून उठला होता.
या संदर्भात विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका अशी शिवसेनानुकुल निश्चितच नाही. किंबहुना शिवसेनेला मागे सारत मुंबईत भाजपाची सत्ता आली तर ती त्यांना हवीच आहे. अशा परिस्थितीत भाजपाला १०० हून अधिक जागा देऊन युती करणे म्हणजे पायावर दगड मारून घेण्यासारखे राहील, असे मत शिवसेनेच्या एका नेत्याने लोकमतशी बोलताना व्यक्त केले.युतीमध्ये भाजपाने मागितलेल्या ११४ जागांची यादी घेऊन मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज वर्षा बंगल्यावर गेले आणि त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी तासभर चर्चा केली.या यादीवर मुख्यमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केले. रात्रीपर्यंत ही यादी शिवसेनेला दिली
जाणार आहे.