विजयदुर्ग कोल्हापूरशी जोडणार

By Admin | Updated: August 21, 2016 00:31 IST2016-08-21T00:26:36+5:302016-08-21T00:31:50+5:30

सुरेश प्रभंूची घोषणा : आचिर्णे स्थानकाचे भूमिपूजन; सिंधुदुर्गमध्ये लवकरच पर्यटन बैठक

To connect Vijaydurg with Kolhapur | विजयदुर्ग कोल्हापूरशी जोडणार

विजयदुर्ग कोल्हापूरशी जोडणार

तळवडे (ता. सावंतवाडी) : कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाला विजयदुर्ग बंदराने जोडणार असून, याबाबत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. ते सावंतवाडी येथे टर्मिनसच्या दुसऱ्या टप्प्याचे तसेच आचिर्णे रेल्वे स्थानकाच्या भूमिपूजनप्रसंगी बोलत होते. यावेळी त्यांनी सिंधुदुर्गमध्ये लवकरच पर्यटनाची बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले.
कार्यक्रमाला सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, माजी आमदार राजन तेली, जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, सावंतवाडी नगराध्यक्ष बबन साळगावकर, सभापती प्रमोद सावंत, मळगाव सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर, रेल्वे संचालक संजय गुप्ता, आयआरटीसीचे अध्यक्ष डॉ. ए. के. मनोचा, बिशप आॅल्विन बरॅटो, बाळासाहेब निकम, प्रभाकर सावंत, रूपेश राऊळ, आदी उपस्थित होते.
मळगाव येथे रेल्वे हॉटेल बनविणार असून, त्याचा प्रकल्प अहवालही तयार करण्यात आला आहे. याबाबत टाटा कंपनीशी चर्चा सुरू आहे. हे हॉटेलही लवकर बनविण्यात येईल, असे त्यांनी जाहीर करून, सिंधुदुर्गची प्रगती पर्यटनातूनच करावी लागेल, यासाठी लवकरच केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री महेश शर्मा यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्गमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यात देशातील पर्यटन क्षेत्रातील महत्त्वाच्या लोकांना बोलाविण्यात येणार आहे, असेही मंत्री प्रभू यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, कोकण रेल्वेचे संचालक संजय गुप्ता, डॉ. ए. के. मनोचा, आदींची भाषणे झाली. बाळासाहेब निकम यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते आर्चिर्णे रेल्वे स्थानकाचे रिमोटद्वारे, तर सावंतवाडी टर्मिनसच्या दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन यावेळी पार पडले. (प्रतिनिधी)

कोकण समृद्ध बनविण्याचे माझे स्वप्न
कोकण रेल्वेमार्गावरचा जास्तीत जास्त विकास करण्यात येणार असून, पूर्वी जे झाले नाही, ते या पाच वर्षांत करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग कोणत्याही क्षेत्रात मागे राहणार नाही, याची काळजी कोकणचा सुपुत्र म्हणून मी घेणार आहे, असे सांगत जास्तीत जास्त विकास करून समृद्ध कोकण बनवायचा आहे. हे माझे स्वप्न असून, ते पूर्ण करणारच, असेही त्यांनी यावेळी सांगितले. पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले, मळगाव रेल्वे स्थानकात रेल्वे हॉटेल बनविण्यासाठी महाराष्ट्र सरकार तीन कोटी रुपयांचा निधी देणार आहे. मात्र, रेल्वे संयुक्तरीत्या हा प्रकल्प करीत असेल, तर राज्य सरकार सर्व ती मदत करेल, असेही त्यांनी जाहीर केले.

लवकरच सर्वेक्षण करणार
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू म्हणाले, यापूर्वी उद्घाटन झाले की दगड लपवावे लागत होते; पण आता परिस्थिती बदलली असून, उद्घाटन झालेले दगड जपून ठेवावे लागत आहेत. काळ बदलला असून, कामांना गती आली आहे. यापूर्वी कोल्हापूर वैभववाडीशी जोडण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता; पण आता कोल्हापूर विजयदुर्ग बंदराशी जोडण्यात येणार आहे. त्याचे लवकरच सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
बेळगाव-रेडी बंदर रेल्वेने जोडा
तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी बेळगाव-सावंतवाडी रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, बेळगाव रेडी बंदराशी जोडले गेले तर आणखी जलदगतीने विकास होईल. या मार्गाचे लवकरात लवकर सर्वेक्षण केले जावे, अशी मागणी राज्याचे गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी प्रभू यांच्याकडे यावेळी केली.
 

Web Title: To connect Vijaydurg with Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.