काँग्रेस करणार सरकारची कोंडी
By Admin | Updated: November 24, 2014 01:22 IST2014-11-24T01:22:50+5:302014-11-24T01:22:50+5:30
राज्यात दुष्काळ जाहीर करून उपयोग नाही. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत करणे सरकारचे कर्तव्य आहे. पण तसे होताना दिसत नाही, या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनात

काँग्रेस करणार सरकारची कोंडी
शेतकऱ्यांना पॅकेज द्या : अन्यथा राज्यभर आंदोलन
नागपूर : राज्यात दुष्काळ जाहीर करून उपयोग नाही. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत करणे सरकारचे कर्तव्य आहे. पण तसे होताना दिसत नाही, या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनात राज्यातील भाजप सरकारची कोंडी करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.
शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी काँग्रेसने व्यूहरचना आखली आहे. त्यानुसार सभागृहात आणि सभागृहाबाहेर शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आंदोलन केले जाणार असल्याची माहिती प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी येथे पत्रपरिषदेत दिली.
विधानसभा निवडणुकीत जनतेने काँग्रेसला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे. पराभवाची कारणमिमांसा करण्यासोबतच सरकारदरबारी राज्यातील जनतेच्या समस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस नेहमीच कटिबद्ध राहील. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने पॅकेज जाहीर करावे. त्यानुसार कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी २५ तर बागायतदार शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत देण्यात यावी, अशी काँग्रेसची मागणी आहे.
राज्यात दुष्काळ असताना गत तीन वर्षांत शेतकऱ्यांना काँग्रेस सरकारने १० हजार कोटींची मदत केल्याची आठवणही त्यांनी भाजप सरकारला यावेळी करून दिली. राज्यात शेतकऱ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या आंदोलनाची प्रमुख जबाबदारी माजी मंत्री नितीन राऊत यांच्याकडे तर संयोजक पद आ.विजय वडेट्टीवार यांच्याकडे राहील. यासोबतच काँग्रेसचे सर्व आजी-माजी खासदार, आमदार आणि जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष या आंदोलनात सहभागी होतील.
माजी मंत्री नितीन राऊत, आ.राजेंद्र मुळक, माजी मंत्री अब्दुल सत्तार, माजी मंत्री अनिस अहमद, आ.अमर काळे, आ. राहुल बोंद्रे, आ.वीरेंद्र जगताप, अॅड.अभिजित वंजारी, शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे, सरचिटणीस अतुल कोटेचा यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)