काँग्रेस करणार मोदी सरकारचा पंचनामा

By Admin | Updated: January 21, 2015 23:53 IST2015-01-21T00:24:25+5:302015-01-21T23:53:47+5:30

हरीष रोग्ये : जनजागृतीसाठी आज मोर्चे, निदर्शने

Congress will make Modi government's Pankanama | काँग्रेस करणार मोदी सरकारचा पंचनामा

काँग्रेस करणार मोदी सरकारचा पंचनामा

कोल्हापूर : देशात सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला दिलेली आश्वासने न पाळता मोदी सरकार जनतेला वाऱ्यावर सोडून धनदांडगे व उद्योगपतींसाठीच काम करीत आहे. त्यांचा हा खरा चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस समितीच्यावतीने उद्या, बुधवारपासून पुढील आठवडाभर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते हरीष रोग्ये यांनी पत्रकार परिषदेत दिली. या जनजागृती मोहिमेचा एक भाग म्हणून उद्या दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कॉँग्रेस कार्यकर्त्यांच्यावतीने निदर्शने करण्यात येणार आहेत. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी निदर्शने, मोर्चे, गावसभा घेऊन नरेंद्र मोदी सरकारचा कारभार कसा चालला आहे, त्यांनी दिलेली आश्वासनेकशी खोटी आहेत, हे जनतेला सांगणार आहोत, असे रोग्ये यांनी सांगितले. वाढती महागाई,भूमी अधिग्रहण कायदा आणि पेट्रोल-डिझेलच्या किमती हे तीन विषय घेऊन जनजागृती मोहीम केली जाणार असल्याचे रोग्ये यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, महागाई कमी करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी मोठी आश्वासने दिली. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्याची घोषणा केली. कर्जबाजारी शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करणार, असे त्यांनी सांगितले; पण यातील एकही गोष्ट त्यांनी पूर्ण केली नाही. शेतकरी आजही आहे त्याच स्थितीत आहे.यावेळी जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, प्रदेश सरचिटणीस सुरेश कुऱ्हाडे, जिल्हा सरचिटणीस एस. के. माळी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

पेट्रोल ३० रुपये लिटर पाहिजे
पेट्रोल-डिझेलमध्ये कशी लूट सुरू आहे, याचे स्पष्टीकरण रोग्ये यांनी यावेळी दिले. कॉँग्रेस सरकार सत्तेवर होते तेव्हा आॅगस्ट २०१३ मध्ये क्रुड आॅईल प्रतिबॅरल ११५ डॉलर होते. त्यावेळी डिझेल ५४ रुपये प्रतिलिटर व पेट्रोल ७४ रुपये प्रतिलिटर होते. आज क्रुड आॅईल प्रतिबॅरल ४७ डॉलर आहे आणि डिझेल ५२ रुपये तर पेट्रोल ६८ रुपये प्रतिलिटर आहे. एकीकडे क्रुडचे दर साठ टक्क्यांनी उतरले असताना डिझेल, पेट्रोलचे दर मात्र उतरले नाहीत. डिझेल २० रुपये लिटर, तर पेट्रोल ३० रुपये लिटर पाहिजे होते. मोदी सरकारने पेट्रोल, डिझेलचे दर कमी केलेले नाहीत. विमान कंपन्यांना सरकार ५१ रुपये प्रतिलिटरप्रमाणे पेट्रोल पुरवठा करते; तर सर्वसामान्य जनतेला आजही ते ६८ रुपये लिटरप्रमाणे ते दिले जाते. मग सरकार कोणासाठी काम करतेय, हे स्पष्ट झाल्याचे हरीश रोग्ये यांनी सांगितले.

पापाचे धनी आता झाले जागे
शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्याचा प्रयत्न कॉँग्रेस सरकारने केला. तरीसुद्धा शेतकऱ्यांच्या नेत्यांनी आंदोलने केली. आम्ही कापसाला ५५०० रुपये, सोयाबीनला ४५०० रुपये, तर उसाला २७५० रुपये भाव दिला. आज भाजप सरकार तो अनुक्रमे ४००० रुपये, ३००० रुपये व २६०० रुपये द्यायला लागले. तरीही शेतकऱ्यांचे नेते गप्प बसले आहेत. पापाचे धनी झालेले हेच नेते आता गप्प असल्याची टीका रोग्ये यांनी यावेळी केली.

Web Title: Congress will make Modi government's Pankanama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.