इंधन दरवाढीविरुद्ध कॉँग्रेस आंदोलन करणार
By Admin | Updated: October 2, 2015 00:19 IST2015-10-02T00:19:32+5:302015-10-02T00:19:32+5:30
पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्ष राज्यातील सर्व जिल्हा व तालुका मुख्यालयी ५ व ६ आॅक्टोबरला आंदोलन करणार आहे,

इंधन दरवाढीविरुद्ध कॉँग्रेस आंदोलन करणार
मुंबई : पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्ष राज्यातील सर्व जिल्हा व तालुका मुख्यालयी ५ व ६ आॅक्टोबरला आंदोलन करणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिली.
लोकोपयोगी निर्णयांमुळे झालेला खर्च व पेट्रोल-डिझेलच्या कमी झालेल्या किमतीमुळे झालेली महसुली घट भरून काढण्यासाठी करवाढ केल्याचा दावा सरकार करीत आहे; परंतु सरकारने कोणत्या लोकोपयोगी योजना आणल्या की ज्यामुळे आर्थिक बोजा वाढला, ते सरकारने जाहीर करावे, असे आव्हानही त्यांनी दिले. भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर सामाजिक न्यायाच्या योजनांना सातत्याने कात्री लागली आहे. कर्जमाफी देण्याची मागणी सरकारने फेटाळून लावली. मग सरकारने नेमका पैसा कुठे खर्च पैसा केला, असा सवालही खासदार चव्हाण यांनी केला.
एलबीटी, टोलमाफीच्या घोषणांची पूर्तता सरकारने करावी; पण त्याचा बोजा जनतेवर टाकू नये. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती निम्म्याहून कमी झाल्या; पण केंद्र सरकारने त्या प्रमाणात भारतातील ग्राहकांना लाभ मिळवून दिला नाही. उलटपक्षी चार वेळा उत्पादनशुल्क वाढवून पेट्रोलवर प्रतिलिटर ७.५० रुपयांचा अतिरिक्त भार ग्राहकांवर लादला. पेट्रोल-डिझेलमध्ये केंद्र सरकारने जनतेच्या खिशातील हजारो कोटी रुपये आपल्या तिजोरीत वळते केले आहेत. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारकडून पैसा आणायला हवा होता; परंतु राज्य सरकारचा प्रभावच नसल्याने हे सरकार केंद्र सरकारकडून भरीव आर्थिक पॅकेज आणू शकलेले नाही, अशी टीकाही खासदार चव्हाण
यांनी केली.
सनातनविरुद्ध कारवाई करणाऱ्या पोलिसांना कठोर शिक्षेची धमकी दिली जात आहे. तरीही सरकार सनातनवर कारवाई करण्यास तयार नाही. कारण, सनातनला राज्य सरकारचा छुपा पाठिंबा आहे, असा आरोपही त्यांनी केला.
(विशेष प्रतिनिधी)