सरकारविरोधात काँग्रेस आक्रमक होणार- पतंगराव कदम
By Admin | Updated: November 25, 2014 23:45 IST2014-11-25T22:50:39+5:302014-11-25T23:45:45+5:30
राजू शेट्टी म्हणजे सरकारचा ‘पार्ट’ आणि पार्सल’ : वाळू माफियांवर नियंत्रणाची जबाबदारी प्रशासनाची

सरकारविरोधात काँग्रेस आक्रमक होणार- पतंगराव कदम
सांगली : दलित हत्याकांडाचा रेंगाळलेला तपास, अवकाळी व दुष्काळी नुकसानभरपाईच्या मुद्द्यांसह सर्वसामान्यांच्या अन्य प्रश्नांवर आता सरकारविरोधात कॉँग्रेस आक्रमक होईल, असा इशारा माजी मंत्री आ. पतंगराव कदम यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिला.
ते म्हणाले की, अवकाळी पावसामुळे सांगली जिल्ह्यातील फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील अन्य दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनाही अद्याप नुकसानभरपाई मिळाली नाही. तांत्रिक गोष्टीत अडवणूक करणे चुकीचे आहे. आघाडी सरकारच्या कालावधित आम्ही नुकसानभरपाईसंदर्भात स्थायी आदेश दिले होते. आताच्या सरकारनेही चार ओळीच्या स्थायी आदेशाद्वारे जिथे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, जिथे त्यांना गरज आहे त्याठिकाणी तातडीने मदत दिली पाहिजे.
राज्यातील नव्या सरकारला एक महिना झालेला आहे. त्यामुळे इतक्यात त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर टीका करणे योग्य नाही. कारभार करण्यासाठी त्यांना थोडी संधी देऊन नंतर त्यावर भाष्य करणे योग्य राहील. तरीही आम्ही दुष्काळी व अवकाळी नुकसानीचा विषय तसेच जवखेडेच्या हत्याकांडाचा रेंगाळलेला तपास अशा गोष्टींवर येत्या हिवाळी अधिवेशनात आक्रमक होणार आहोत. अधिवेशनातील त्यांच्या निर्णयांची कल्पनाही आम्हाला व राज्यातील जनतेला येईल. (प्रतिनिधी)
वाळूप्रश्नी प्रशासनाची जबाबदारी
वाळू माफियांकडून राजापूर ग्रामस्थांवर झालेला हल्ला निषेधार्ह आहे. अशा माफियांना रोखण्याची जबाबदारी ही प्रामुख्याने जिल्हा प्रशासन व पोलिसांची आहे. त्यांनी कठोर पावले उचलली तर माफियाराजचे काहीही चालणार नाही. त्यामुळे या दोन्ही यंत्रणांनी आता सतर्क रहावे, असे मत कदम यांनी व्यक्त केले.
पाण्याचा रोग जुना, पण जाणार कधी?
सांगली, मिरजेतील गॅस्ट्रोच्या साथीबद्दल ते म्हणाले की, ही बाब गंभीर आहे. महापालिका आयुक्त व आरोग्य अधिकाऱ्यांशी मी चर्चा करणार आहे. दूषित पाण्यामुळेच ही साथ पसरली आहे. सांगली, मिरजेतील पाण्याचा रोग जुना असला तरी तो जाणार कधी, हा प्रश्न आहे.
नेत्याचेही लक्ष नाही
इतक्या कष्टाने आम्ही महापालिकेत सत्ता मिळवली, पण कारभार कसा चाललाय, हे कळेना झाले आहे. महापालिकेचा नेता म्हणून ज्यांच्यावर जबाबदारी दिली, तेही आता काही पहात नाहीत. त्यामुळे मी स्वत: महापालिकेच्या कारभाराचा आढावा घेईन, असे त्यांनी सांगितले.
सरकार काय ते कळेल
एलबीटीबाबतची भाजपची भूमिका निवडणुकीत एक होती आणि आता एक आहे. व्यापाऱ्यांनी त्यांना साथ दिली होती. आता त्यांचे सरकार नेमके कसे आहे, ते व्यापाऱ्यांना कळेल, अशी खोचक टीका कदम यांनी यावेळी केली.
राजू शेट्टी म्हणजे सरकारचा ‘पार्ट’ आणि पार्सल’
ऊसदराच्या प्रश्नावर पतंगराव कदम म्हणाले की, शासन जो ‘एफआरपी’ निश्चित करेल, त्याप्रमाणे कारखाने दर देण्यास बांधिल असतील. यापूर्वीही कारखानदारांची तीच भूमिका होती. राजू शेट्टी यांनी आंदोलन पुढे ढकलले असले तरी, आता ते सरकारचा पार्ट आणि पार्सल आहेत. त्यामुळे त्यांनी व सरकारने दराबाबत धोरण ठरवावे. आम्ही कारखानदार एफआरपीची अंमलबजावणी करू.