शरद पवारांमुळेच काँग्रेस कमकुवत !
By Admin | Updated: September 14, 2015 02:01 IST2015-09-14T02:01:30+5:302015-09-14T02:01:30+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्तेसाठी काँग्रेसचा वापर करुन घेतल्यानेच आज पक्ष कमकुवत झाला आहे. अलीकडच्या काळात तर काँग्रेस पक्ष त्यांच्या इशाऱ्यावर चालत होता

शरद पवारांमुळेच काँग्रेस कमकुवत !
अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्तेसाठी काँग्रेसचा वापर करुन घेतल्यानेच आज पक्ष कमकुवत झाला आहे. अलीकडच्या काळात तर काँग्रेस पक्ष त्यांच्या इशाऱ्यावर चालत होता, असे परखड मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे-पाटील यांनी केले. मराठवाड्याने यापुढील निवडणुका केवळ पाण्याच्या मुद्यावरच लढवाव्यात, असे आवाहन त्यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत केले.
बारामतीकरांची पाठिंब्याची चाल नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांनी वेळीच ओळखली. त्यामुळे पवारांना प्रयत्न करूनही सत्तेबाहेर बसावे लागले, असा टोला विखे- पाटील यांनी लगावला. गेल्याच आठवड्यात विखे यांनी राज्यातील दुष्काळाला पवार जबाबदार असल्याचा आरोप केला होता. त्यावर विखे- पाटील यांनी कोणाचा मुखवटा घातला आहे, असा सवाल राष्ट्रवादीने केला होता. विखे- पाटील यांनी मात्र त्याला उत्तर न देता रविवारी पुन्हा पवारांवर आरोपांची सरबत्ती केली.
बारामतीकरांनी सत्ता पूर्णपणे त्यांच्या इच्छेनुसार राबवली. त्यात काँग्रेस कार्यकर्त्यांची ससेहोलपट झाली. सत्ता अनुकूल असूनही पवारांनी तेव्हा पाणीप्रश्न प्रलंबित ठेवला. फडणवीस सरकार पाडण्यासाठी त्यांनी सेनेला तोडण्याचा प्रयत्न केला. त्यात यश न आल्याने ते निराश झाले असावेत. सत्तेत भागीदारी मिळाली असती तर त्यांनी मोर्चा काढला असता का, असा प्रश्न विखे-पाटील यांनी केला.
एवढी वर्षे पाटबंधारे खाते सांभाळूनही सिंचनाचा प्रश्न का
सुटला नाही, हे काम अनावधानाने राहून गेले का, असा सवाल त्यांनी केला. वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील आज असते तर त्यांनी पश्चिमेचे पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्यासाठी जीवाचे रान केले असते. सरकारने केंद्राचा निधी व कर्जरोख्यातून हा प्रश्न मार्गी लावावा, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)