Vijay Wadettiwar News: जनतेला भूल-थापा देऊन सत्ता काबीज करणाऱ्या भाजपाने देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे करून उद्योगपतींचे घर भरले आहे. सर्वत्र लूट माजविणाऱ्या भाजपाने जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी धर्मांधता पसरविणे सुरु केले आहे. देशात महागाई, बेरोजगारी, प्रचंड वाढली असताना दुसरीकडे लोकांच्या हातून रोजगार हिरावला जात आहे. निष्ठूर व जनतेवर सूड उगवणाऱ्या भाजप सरकारला सत्तेतून हद्दपार करा व संविधान आणि लोकशाही वाचवा, असे आवाहन काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. तसेच लोकशाही टिकवायची असेल तर इंडिया आघाडीच एकमेव पर्याय आहे, असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.
देशांत सत्ताधाऱ्यांकडून स्वाय्यत संस्थांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर सुरु आहे. पक्ष फोडाफोडीचे राजकरण सुरु आहे. देशातील महीला भगिनी सुरक्षित नाही. भ्रष्ट राजकारण्यांना क्लीन चिट देण्याचे कार्य सुरु आहे. पेट्रोल, डिझेल , गॅस, खते, दूध यावर प्रचंड प्रमाणात भाववाढ व जीएसटी लावून जनतेची तसेच शेतकऱ्यांची लूट केल्या जात आहे. रुपयांत सातत्याने घसरण होत आहे. अर्थव्यवस्थेचे वाटोळे झाले तरी मात्र देशभक्ती व धर्मांधतेचे सोंग करुन दिशाभूल करण्याचे काम सुरु असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.
गडचिरोली-चिमूर लोकसभेचे इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. नामदेव किरसान म्हणाले की, मी पक्ष संघटन, कार्यकर्ता भेटी व कामात सातत्य ठेवल्याने मला पक्षाकडून निवडणूक लढण्याची जबाबदारी मिळाली. तर उमेदवारी मिळण्यामागे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सिंहाचा वाटा असल्याचे नामदेव किरसान यांनी नमूद केले.