Congress Vijay Wadettiwar: महाराष्ट्रात अतिवृष्टीने मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात नुकसान झाले आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
राज्याला पावसाने झोडपून काढले आहे , असे असताना पालकमंत्री अजून जिल्ह्यांमध्ये आढावा घ्यायला गेले नाही. या आठवड्यात पावसाचा जोर वाढणार, असा इशारा आहे. त्यामुळे लोकांना, जनावरांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्यात यावे. गरज पडल्यास अतिरिक्त NDRFच्या टीम तैनात करण्यात याव्यात, पिकविम्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही, सरकारने निवडणुकीच्या आधीचा जो जीआर आहे त्यानुसार शेतकऱ्यांना मदत करावी. शेतकऱ्यांना जास्त मदतीची अपेक्षा असल्याने प्रति हेक्टरी ५० हजार रुपये देण्यात यावे, अशी मागणी वडेट्टीवर यांनी केली.
अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा
लोक रडत आहे, घरात काही खायला उरले नाही. मराठवाडा संपला, विदर्भात नुकसान झाले आहे. सर्वांची मागणी आहे ओला दुष्काळ जाहीर करा. मदत काय करता? जुना जीआर बदलून कमी मदत करत आहेत. त्यात शेतकऱ्यांना फायदा नाही. ओला दुष्काळ जाहीर करून भरीव मदत करता आली असती. एकरी पन्नास हजार रुपयांची मदत करा. या नैसर्गिक संकट मधून बळीराजा वाचवायचे असेल तर भरीव मदत करा. आता जी मदत करतात ती थातुर-मातुर आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची दिल्लीत वट आहे. राज्यातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव त्वरित केंद्राला पाठवला पाहिजे. जनतेला भरीव मदत दिली पाहिजे. केंद्राने मदत दिली तर जास्त मदत करता येईल. निवडणुका नाही म्हणून मदत नाही हे सोंग बंद केले पाहिजे, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने रविवारी रात्री आणि सोमवारी पहाटे मराठवाड्यात अक्षरश: कहर केला आहे. बीड, धाराशिव, हिंगोली, जालना जिल्ह्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली. प्रकल्पांमधून विसर्ग सोडल्याने गावागावांमध्ये पाणी शिरले आहे. उरलीसुरली पिकेही खरडून निघाली आहेत. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसाने आजपर्यंत ५ हजार ३२० गावांतील पिकांचा चिखल केला. दोन दिवसांत विविध जिल्ह्यात २२ गावांचा संपर्क तुटला. ७० जणांना सुरक्षित ठिकाणी हलविले.