गोवा राष्ट्रवादीत फूट पाडण्याचे काँग्रेसचे प्रयत्न अयशस्वी
By Admin | Updated: December 27, 2014 04:24 IST2014-12-27T04:24:50+5:302014-12-27T04:24:50+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिघा नेत्यांना पक्षात ओढण्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांच्यामार्फत केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले.

गोवा राष्ट्रवादीत फूट पाडण्याचे काँग्रेसचे प्रयत्न अयशस्वी
पणजी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिघा नेत्यांना पक्षात ओढण्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांच्यामार्फत केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नीळकंठ हळर्णकर, माजी मंत्री जुझे फिलिप डिसोझा व राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांना काँग्रेसमध्ये प्रवेश द्यावा, असे फालेरो यांनी ठरविले होते. तिघांशी चर्चा करून त्यांचे मन वळविण्याची जबाबदारी फालेरो यांनी कळंगुटचे माजी आमदार फर्नांडिस यांच्यावर सोपवली होती. फर्नांडिस यांची तिन्ही नेत्यांसोबत बैठक झाली. हळर्णकर, डिसोझा व डिमेलो यांनी बैठकीत भाग घेतला. तिघांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्यातरी सोडणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर फर्नांडिस यांनी फोनवरून तिघांनाही फालेरो यांच्याशी बोलायला लावले. फालेरो यांच्याशी बोलणी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जानेवारीत काय तो निर्णय कळवतो, असे फालेरो यांना सांगितले. गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेस वाढणार नाही, उलट काँग्रेसच्याच उमेदवारीवर २०१७मध्ये तुम्हाला विधानसभा निवडणूक लढवावी लागेल, असे चित्र काँग्रेसने राष्ट्रवादीसमोर उभे केले आहे.