राकाँच्या घरभेदीपणापासून काँग्रेसची सुटका
By Admin | Updated: October 12, 2014 01:20 IST2014-10-12T01:20:32+5:302014-10-12T01:20:32+5:30
धर्मनिरपेक्ष शक्तीला सोबत घेऊन काँग्रेस संपूर्ण शक्तिनिशी निवडणूक रिंगणात उतरली असून राष्ट्रवादीशी युती तुटल्याने त्यांच्या घरभेदीवृत्तीपासूनही काँग्रेसची सुटका झाली आहे.त्यामुळे या निवडणुकीत

राकाँच्या घरभेदीपणापासून काँग्रेसची सुटका
रिता बहुगुणा : काँग्रेसचीच सत्ता येणार
विकास मिश्र - नागपूर
धर्मनिरपेक्ष शक्तीला सोबत घेऊन काँग्रेस संपूर्ण शक्तिनिशी निवडणूक रिंगणात उतरली असून राष्ट्रवादीशी युती तुटल्याने त्यांच्या घरभेदीवृत्तीपासूनही काँग्रेसची सुटका झाली आहे.त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसची स्थिती उत्तम आहे. काँग्रेसच अपेक्षापूर्ती करणारा पक्ष असल्याने जनतेचा कौल आम्हाला मिळेल, असा विश्वास ज्येष्ठ नेत्या रिता बहुगुणा- जोशी यांनी व्यक्त केला. काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ त्या नागपुरात आल्या असता त्यांच्याशी ‘लोकमत’ने विशेष संवाद साधला.त्या म्हणाल्या की, महाराष्ट्रातील निवडणूक वेगळी आहे. येथे काँग्रेसकडे परंपरागत आणि विश्वसनीय मते आहेत. केंद्रातील मोदी सरकारने अपेक्षाभंग केल्याने त्यांच्यावर ग्रामीण भागातील जनता नाराज आहे. त्यामुळे काँग्रेसची स्थिती भक्कम झाली आहे. महाराष्ट्रात आम्हीच पुन्हा सत्तेत येऊ असे सध्याचे चित्र आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसोबतची आघाडी तुटल्याने काही परिणाम होईल का, या प्रश्नावर रिता बहुगुणा जोशी म्हणाल्या, महाराष्ट्रातील गेल्या तीन निवडणुकांचा अनुभव माझ्याजवळ आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचा व्यवहार आघाडी असतानाही व्यवस्थित नव्हता. राष्ट्रवादीच्या उमेदवारांना काँग्रेस पूर्ण ताकदीने मदत करायची. परंतु जिथे काँग्रेसचे उमेदवार उभे असायचे तिथे राष्ट्रवादीकडून घरभेदीपणा केला जायचा.