काँग्रेसचे खजिनदारपद स्वत: नाकारले - कदम
By Admin | Updated: April 25, 2016 04:44 IST2016-04-25T04:44:25+5:302016-04-25T04:44:25+5:30
महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस समितीचे खजिनदारपद मी स्वत:हून नाकारले आहे. काही तात्त्विक मुद्द्यांवरून याबाबत वाद झाले.

काँग्रेसचे खजिनदारपद स्वत: नाकारले - कदम
कडेगाव (जि. सांगली) : महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस समितीचे खजिनदारपद मी स्वत:हून नाकारले आहे. काही तात्त्विक मुद्द्यांवरून याबाबत वाद झाले. परंतु, मुंबईत गेल्यावर हा वाद मिटविणार आहे. कॉँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हा मेळाव्यात याबाबत बोललो. परंतु, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांनी कडेगाव येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
खजिनदारपद गेली १५ वर्षे सांभाळले. आर्थिक अडचणींवर मात करून सर्वांना बरोबर घेऊन एकसंधपणे काम केले, असे सांगून पतंगराव कदम म्हणाले, मी पदासाठी नाही, तर जनतेसाठी आणि पक्षासाठी काम करणारा नेता आहे. २० वर्षे मंत्री असताना कोणताही भेदभाव न मानता सर्वांची कामे कर्तव्य म्हणून धडाक्याने केली. सध्याही राज्यस्तरावर पक्षकार्याबरोबर जिल्ह्यातील आणि मतदारसंघातील जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहे. पद कोणतेही असो, पदाचा दर्जा मी माझ्या कामातून वाढवितो.
शासन दुष्काळाबाबत गंभीर नाही. दुष्काळी परिस्थिती असताना, तातडीने उपाययोजना झाल्या पाहिजेत. पुढील आठवड्यात जालना जिल्ह्याचा दौरा करणार असल्याचेही पतंगराव कदम यांनी सांगितले.