काँग्रेस-राकाँ व भाजप शिवसेना स्वतंत्र लढणार
By Admin | Updated: August 3, 2014 00:52 IST2014-08-03T00:52:40+5:302014-08-03T00:52:40+5:30
महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्षात आगामी विधानसभा निवडणुकीत युती किंवा आघाडी होण्याबाबत शंका आहे. त्यामुळे काँग्रेस-राकाँ व भाजप शिवसेना हे प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे निवडणुका लढतील

काँग्रेस-राकाँ व भाजप शिवसेना स्वतंत्र लढणार
प्रकाश आंबेडकरांचे भाकीत : युती-आघाडीबाबत शंका
नागपूर : महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्षात आगामी विधानसभा निवडणुकीत युती किंवा आघाडी होण्याबाबत शंका आहे. त्यामुळे काँग्रेस-राकाँ व भाजप शिवसेना हे प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे निवडणुका लढतील आणि निवडणुकीच्या निकालानंतरच युती किंवा आघाडीबाबत निर्णय घेतील, असे भाकीत भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी येथे पत्रपरिषदेत वर्तविले.
महाराष्ट्रातील सध्याची एकूणच राजकीय परिस्थिती पाहता त्यांनी उपरोक्त मत व्यक्त केले आहे. भाजप केंद्रात पूर्ण बहुमतात असल्याने ते शिवसेनेला कुठलाही भाव देताना दिसून येत नाही. शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनाही त्यांनी अनेकदा महत्त्व दिलेले नाही. याची सल शिवसेनेला आहे. यातच महाराष्ट्रात भाजपकडे फडणवीस सोडले तर प्रामाणिक चेहरा नाही.
तसेच काँग्रेस राष्ट्रवादी पार्टीला एकही जागा वाढवून देण्यास तयार नाही. एक जागाही वाढवून दिली तर ते त्यांचे अपयश असल्याचे संकेत जातील. असे संकेत काँग्रेस कदापि देणार नाही. त्यामुळे चारही जण आपापल्या भूमिकांवर अडून बसले तर निवडणुकांपूर्वी युती किंवा आघाडी होणार नाही. निवडणुकांच्या निकालानंतरच नवीन समीकरणे तयार होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. आपण स्वत: महाराष्ट्र लोकशाही आघाडी अंतर्गत निवडणुका लढणार आहोत. या आघाडीत ५ राजकीय पक्ष व ७ विविध संघटनांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये युतीला भरघोस यश आले. परंतु नरेंद्र मोदी यांची लहर आता ओसरली आहे. महाराष्ट्रात ज्या-ज्या पक्षांची कमिटेड मते त्या-त्या पक्षाला मिळाली तर विधानसभा निवडणूकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेत पक्षाचे ज्येष्ठ नेते मिलिंद पखाले, नगरसेवक राजू लोखंडे, डॉ. संदीप नंदेश्वर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मुस्लिमांच्या आरक्षणातील तांत्रिक अडचण दूर व्हावी
राज्य सरकारने मराठा व मुस्लिमांना आरक्षण जाहीर केले आहे. परंतु त्यात एक अडचण आहे. आरक्षणाची अधिसूचना जारी करताना मुस्लीम समाजाला आरक्षण असे जाहीर करण्यात आले आहे. परंतु मुस्लीम समाजातील विद्यार्थी हे त्यांच्या जात प्रमाणपत्रांवर मुस्लीम असा उल्लेख करीत नाही. ते इस्लाम हा शब्द वापरतात. तेव्हा ही तांत्रिक अडचण निर्माण करून शासनाने मुस्लिमांच्या अडचणी वाढविल्या आहेत. त्या तातडीने दूर कराव्यात. तसेच अॅग्रीकल्चर लॅण्डबाबत शासनाने घेतलेला निर्णय चुकीचा असून त्यामुळे शहराचा नियोजित विकास रखडेल, अशी भीती व्यक्त करीत हा निर्णय मागे घेण्याची मागणी त्यांनी केली.